नगर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आ.रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या मालकीचा कन्नड येथील साखर कारखाना ईडी’ने जप्त केल्यानंतर आ.रोहित पवार चांगलेच संतापले आहेत. आता मी भाजपात जावे का? असा उपहासात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित करत मी संघर्ष करणारा स्वाभिमानी आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे कितीही खोट्या कारवाया केल्या तरी झुकणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. शिखर बँक घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांची नावे असून कारवाई फक्त विरोधात असलेल्या पक्षांच्या नेत्यावर होत असताना रोहित पवार यांनी आता नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ट्विट करत तिखट शब्दात निशाणा साधला आहे. आपल्या ट्विट मध्ये आ.रोहित पवार यांनी..

“युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे.
पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का?
माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही.
त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय…
हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही…” अशा कडक आणि तिखट शब्दात टीका करत निशाणा साधला आहे.
https://twitter.com/rrpspeaks/status/1766326397738631645?s=46