नगर:
पारनेरचे आमदार निलेश लंके सध्या राज्यभर चर्चेत असून ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात असताना निलेश लंके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबद्दल मोठी उत्सुकता ताणलेली आहे. स्वतः निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत स्वतः कोणतेही वक्तव्य केले नसून या केवळ कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि माध्यमातून चर्चा असल्याचे म्हंटले आहे.
मात्र असे असले तरी निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मोठी तयारी केली असून त्या दृष्टीने अनेक जाहीर कार्यक्रमातून मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवणार अशी मोठी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र यावर कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके कुठेही जाणार नाहीत याबद्दल आपलं ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी आमदार निलेश लंके हे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याचे दिसून आले आहे. निलेश लंके आज मंत्रालयात काही जवळच्या मोजक्या कार्यकर्त्यांसह आलेले आहेत. ते अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
एकंदरीत निलेश लंके यांच्या लोकसभा उमेदवारीवरून निर्माण झालेले गूढ या पार्श्वभूमीवर ते शरद पवार राष्ट्रवादी गटा कडूनच निवडणूक लढवणार असं बोललं जात असताना आज अचानक निलेश लंके अजित पवारांच्या भेटीला मंत्रालयात आलेले असल्याने पुन्हा एकदा निलेश लंके यांच्या अजित पवार यांच्या भेटी मागे नेमकं कारण काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राजकारण क्षणाक्षणाला बदलत असते अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारी कोणत्या पक्षाकडून करणार या प्रश्नावर परवाच माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुसऱ्यांदा बैठक होत असून या बैठकीत विविध निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके आपल्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील कामे मंजूर करून घेण्यासाठी अजित दादांच्या भेटीला आले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र याच बरोबर एकीकडे ते लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून लढवणार असे चित्र निर्माण झालेले असताना आणि कालच अजित पवार यांनी निलेश लंके कुठेही जाणार नाहीत असं ठामपणे सांगितलेले असताना आज लगेचच निलेश लंके मंत्रालयात आले असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार ही “आशीर्वादपर निरोपाची” भेट असू शकते आणि आज-उद्याच निलेश लंके नगर मध्ये पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत.