नगर:
राज्याच्या मध्यवर्ती असलेला नगर जिल्हा नेहमीच महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि राजकीय सत्तेतही केंद्रीभूत असाच राहिलेला आहे. नगर जिल्ह्यात असलेले राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या नेत्यांची अनेक वर्ष जिल्ह्यासह राज्यातील राजकारणात आणि सत्तेत मोठी पकड राहिलेली आहे. या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी विखे आणि थोरात यांचे विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने काहीसा दुर्लक्षित राहिला गेला आहे.
उत्तर नगर जिल्ह्यात विखे,थोरात यांच्यासह काळे, कोल्हे, पिचड यांचे राजकीय वर्चस्व असले तरीही शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी व निवडणुकीला उभा असलेला उमेदवार हा विखे किंवा थोरात यांच्या आशीर्वादानेच निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहत असतो.
त्याच अनुषंगाने 2009 पासून शिर्डी लोकसभा मतदार संघाचा इतिहास पाहिल्यास 2009 ला राधाकृष्ण विखे यांच्या पाठबळावर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी ही निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे त्यावेळी थोरात-विखे काँग्रेस पक्षात होते. एकाच पक्षात विखे-थोरात असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उमेदवार असतानाही आठवले यांना धक्कादायक आणि मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे अपेक्षेप्रमाणे आश्चर्यकारकरित्या खासदार बनले. एकूणच त्यावेळचे राजकारण पाहिल्यास आरपीआय आणि रामदास आठवले यांच्यामुळे ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढेल काय? यावर मोठी चर्चा झाली किंवा आणली गेली आणि यामुळे आठवले यांना जिव्हारी लागणारा मानहारीकारक पराभव सोसावा लागला.
त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अचानकपणे पक्षांतर करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. अचानकपणे त्यावेळी घडलेल्या या घडामोडीत शिवसेनेला सदाशिव लोखंडे यांना निवडणुकीत उतररावे लागले. काही मोजक्या दिवसांची प्रचाराची संधी असताना सदाशिव लोखंडे हे शिवसेने कडून खासदार झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 ला पुन्हा एकदा शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचौरे, आप कडून नितीन उदमले यांनी आपले नशीब आजमावले. मात्र या सर्वांना मात देत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे निवडून आले.
दरम्यान पूला खालून बरेच राजकीय पाणी वाहून गेलेले असताना यात भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा एकदा फूट पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले असून आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. तर आप पक्ष आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेले नितीन उदमले यांनीही शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
सलग दोन टर्म शिवसेनेकडून खासदार असलेली सदाशिव लोखंडे यांच्या बद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघात नागरिकांत मोठी नाराजी असल्याचे विविध पातळीवर केलेल्या सर्वेतून समोर आल्याचं बोललं जात आहे. राधाकृष्ण विखे यांच्याशी त्यांचे अनेक बाबतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत सदाशिव लोखंडे यांचा “पत्ता” कट झाल्याची मोठी चर्चा आहे. या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणल्याची खात्रीशीर माहिती आहे.
या परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी अंतिम मानली जात असताना जर भारतीय जनता पक्षाकडे शिर्डीची जागा आलेली असेल तर भाजपाचा उमेदवार कोण याबद्दल आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय, स्वयंसेवक संघ, संघाचे इतर अनेक संघटन याकडून जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकारी राहिलेले आणि देवेंद्र फडवणीस यांच्या नेहमी संपर्कात असलेले नितीन उदमले यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. उदमले सध्या भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्षपदी असून जिल्ह्यासह राज्यभरात त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले आहेत.
मात्र याबाबत अद्याप भाजप कडून त्यांच्या उमेदवरीबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे खेचून आणला असून या ठिकाणी धक्कातंत्र अवलंबत नितीन उदमले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघाडी कडून प्रशासकीय अधिकारी राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली जात असताना भारतीय जनता पक्षही प्रशासकीय अधिकारी राहिलेले आणि संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ असलेले नितीन उदमले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसात शिर्डी लोकसभा मतदार संघात महायुती कडून कोणत्या पक्षाला शिर्डी लोकसभेची जागा दिली जाणार आणि त्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार याची मोठी उत्सुकता असणार आहे.
लोखंडे-आठवलेंचे काय??
– खासदार सदाशिव लोखंडे हे 2014 आणि 2019 ला असे सलग दोन वेळी युतीत शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहे. त्यापूर्वी ते कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राखीव असताना तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत त्यामुळे एवढ्या अनुभवी नेत्याला उमेदवारी मिळणार नसेल तर त्याबद्दल निश्चितच खासदार लोखंडे यांना पक्षाकडून शब्द दिला जाईल असे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर राखीव मतदार संघातून लोखंडे निवडणूक लढवू शकतात. दुसरीकडे रामदास आठवले यांनी अनेकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. मात्र 2009 ला आठवले यांचा झालेला दारून मानहानीकारक पराभव पाहता त्यांना पुन्हा शिर्डी येथील जागा दिली जाण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नितीन उदमले आणि महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्येच लढत होईल असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.