नगर:
आ.निलेश लंके यांची आज घरवापसी अंतिम झाली आहे. आज गुरुवारी दुपारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे लंके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र स्वतः आ.निलेश लंके यांनी याबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नसून अधिकृतपणे पक्ष प्रवेश झाल्यानंतरच लंके आपली भूमिका मांडतील असे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास आ.निलेश लंके यांच्या हंगा गावात कार्यकर्ते जमणार असून त्यानंतर आ.लंके यांच्यासह कार्यकर्त्यांचा जथा पुण्याकडे रवाना होणार आहे. त्यानंतर दुपारी पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते आ.निलेश लंके यांचा अधिकृत पक्ष प्रवेश होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आज लंके प्रवेश करणार असल्याने निकटचे सहकारी,पक्षाचे पदाधिकारी यांना याबाबत कळवण्यात आलेले आहे.
काल बुधवारी भाजप कडून खा.सुजय विखे यांना पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा होताच निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशाबाबत हालचाली वाढल्या. लंके यांच्या शरद पवार गटात प्रवेश होण्याचे निश्चित मानले जात असल्याने नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार हे निश्चित असून एकूणच या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
आ.निलेश लंके गेली दोन-अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आणि त्यांना तशा सूचना थेट शरद पवार यांच्या कडून देण्यात आल्याचे बोलले जात होते. मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या बाबत पृष्ठी दिली होती. मात्र दरम्यान काहि महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळजवळ चाळीस आमदारांसह शिंदे सरकार मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार यांच्या सोबत आ.निलेश लंके यांनी जाणे पसंत केले होते.
गेली दोन-अडीच वर्षे लंके हे लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मोडवर होते. त्यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवत विविध कार्यक्रम घेतले होते. मात्र निवडणूक लढवण्याबाबत बाबत स्वतः निलेश लंके यांनी आज पर्यंत वक्तव्य केले नव्हते. पक्षाचा मी एक छोटा आणि सामान्य कार्यकर्ता असून वरिष्ठ देतील तो आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचे सातत्याने सांगितले होते. मात्र लंके हे ऐनवेळी अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा घरवापसी करत शरद पवार यांच्या सोबत येतील अशी मोठी चर्चा होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक आमदार खाजगीत याला पृष्ठी देत होते. अखेर आज आ.निलेश लंके शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.