नगर:
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.निलेश लंके यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेज वरील प्रोफाईल पिक्चर वरील फोटो आज गुरुवारी सायंकाळी बदलला आहे.
यापूर्वी असलेल्या फोटोत संसदेसह निलेश लंके यांच्या फोटोवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हे चिन्ह ठळकपणे होते. गुरुवारी आ.निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यानंतर काही वेळातच आ.लंके यांच्या अधिकृत फेसबुक वरील पूर्वीचे प्रोफाइल पिक्चर बदलण्यात आले असून आता लंके यांचे प्लेन छायाचित्र ठेवण्यात आले आहे.
आ.निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवणार आणि ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष्याकडून अशी जोरदार चर्चा होती. मात्र लंके यांनी या वृत्तास दुजोरा दिलेला नाही. गुरुवारी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र या वेळीही लंके यांनी आपले “पत्ते” ओपन केलेले नाहीत. मात्र लंके यांचे कार्यकर्ते यांनी एकूणच दिलेल्या घोषणा, लंके यांनी शरद पवारांसमोर हाती पकडलेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाव आणि चिन्ह असलेली तुतारी चिन्हांचे हॅन्ड पोस्टर पाहता आणि याच कार्यक्रमात लंके यांना निवडणूक लढवण्यासाठी समर्थक कार्यकर्त्यांकडून मिळालेली आर्थिक मदतीचे धनादेश, अनेक नेत्यांची सूचक वक्तव्ये आणि खुद्द शरद पवारांनी निलेश लंके यांना देऊ केलेली मदत पाहता लंके अनौपचारिक शरद पवार यांच्या सोबत गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. आता त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेज वरील प्रोफाइल पिक्चर मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ चिन्ह असलेला फोटो हटवून प्लेन फोटो घेतला असल्याने “समझदार को इशारा काफी” या उक्तीप्रमाणे संदेश गेला आहे. लंकें पक्षप्रवेशाची तुतारी वाजेल तेंव्हा वाजेल मात्र आज शरद पवारांच्या उपस्थितीत लंकेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत वाजवलेला “बिगुल” लंके हे लोकसभा निवडणुक लढवणार याची स्पष्ट नांदी देणारा असाच म्हणावा लागेल.