नगर:
खा.सुजय विखे यांना भाजप कडून उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आला. यामागे भाजप मधील जिल्ह्यातील नेते, पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी साठी पक्षाकडे केलेली मागणी आणि माध्यमातून केलेली वक्तव्ये या मुळे सुजय विखेंच्या उमेदवारीवर आव्हान उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. आ.राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या गोटातले मानले जातात. तसेच प्रदेश कार्यकरणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड पक्षासाठी निष्ठावन्त म्हणून जुने कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्षाकडून नगर दक्षिणेसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. आ.राम शिंदे 2014 पासून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तशी त्यांनी पक्षाकडे अनेकदा मागणी केलेली आहे. पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्यास आपण लोकसभा सक्षमपणे लढवण्यास तयार असल्याचे वक्तव्य राम शिंदे यांनी माध्यमातून व्यक्त करत ट्विस्ट निर्माण केला होता. तसेच नुकतेच लोकसभेच्या तयारीत महाविकास आघाडीकडून तयारीत असलेले आ.निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या खा.अमोल कोल्हे यांच्या बहुचर्चित “शिवपुत्र संभाजी” या महानाट्यास राम शिंदे यांनी उपस्थिती लावत लंके यांना भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. लंके हे जनतेच्या गळ्यातले ताईत बनले आहेत, त्यांनी पारनेर विधानसभेत कमी बॉल मध्ये जास्त धावा करून जास्त रनरेट दाखवला आहे, अशी अनेक सूचक वक्तव्य करत लंके भविष्यात यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या होत्या. निलेश लंके आणि राम शिंदे दिवाळी असो वा मोहटादेवी दर्शन निमित्ताने एकत्र आलेले दिसले. त्यांचा एकाच गाडीतून केलेला प्रवास सोशल मीडियावर चर्चेत आला. एकूणच लंके-शिंदे यांचा “यह रीश्ता क्या कहलाता है?” असा विषयही चर्चेत आला. “शिवपुत्र संभाजी” महानाट्याच्या निमित्ताने भाजप मध्ये असलेले युवानेते विवेक कोल्हे यांनीही उपस्थिती लावत लंके यांचे कौतुक केले. दक्षिणेला लागलेल्या कॅन्सरवर आ.डॉ.निलेश लंके उपचार करतील असे बोचरे वक्तव्य कोल्हे यांनी केले.
एकूणच भाजपंतर्गत इच्छुकांची संख्या वाढत असताना आ.लंके यांच्या समर्थनार्थ अप्रत्येक्ष वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान भाजपच्या दोन सदस्यीय निरीक्षक समितीने अहमदनगर दक्षिण लोकसभे बाबतचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला. या अहवालात विखे विरोधात नाराजी असल्याचे मत काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे आणि पुन्हा उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा आहे. यातूनच सुजय यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळेल का यावर संशयकल्लोळ निर्माण केला गेला. मात्र 13 मार्च रोजी भाजप केंद्रीय लोकसभा निवडणुक समितीच्या मान्यतेने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पहिली यादी घोषित झाली. या पहिल्याच यादीत सुजय विखे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी घोषित केली. सुजय विखे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते. अनेकांचे राजकीय आडाखे यावर अवलंबून होते. अनेकांना काही स्वप्ने पडू लागली होती. मात्र सुजय विखे यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा विश्वास टाकत उमेदवारी घोषित करताच अनेकांच्या आशा-आकांक्षावर पाणी पडल्याचे आणि घोर निराशा झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर सुजय विखे यांच्या समर्थनार्थ “पुन्हा एकदा सुजय पर्व” अशा पोस्ट मधून उमेदवारी मिळू नये या अपेक्षेत असलेल्या मंडळींवर मार्मिक प्रतिक्रिया येत आहेत. यामुळे एकूणच सुजय विखेंच्या उमेदवारी विरोधात पेटलेले ताबूत उमेदवारी घोषित होताच लगोलग थंड झाल्याचे चित्र आहे. भाजपात शिस्तीला मोठे महत्व असून याकडे केंद्रीय नेतृत्वाचे बारीक लक्ष असते. त्यामुळे आता विखेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर अनेकांनी शांत रहाणे अथवा सूचक प्रतिक्रिया देणे पसंत केले आहे. दरम्यान शांत-सयंमी आणि भाजपशी एकनिष्ठ-निष्ठावंत म्हणून ओळख असलेले प्रदेश कार्यकारीणी सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी ट्विट करत सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटची जिल्ह्यात आणि विशेष करून पक्षात चर्चा होत असून बेरड यांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.
प्रा.बेरड यांचे ट्विट:
आमच्यासाठी पक्षादेश सर्वोच्च
-कोणतेही पद नसतानाही माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी जुण्याजाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी व जनतेने दाखविलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे
पक्ष देइल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे
प्रा भानुदास बेरड
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra