नगर:
आमदार निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवणार की नाही आणि लढवली तर ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार का याबद्दल असलेली उत्सुकता आता अंतिम टप्यात पोहचली आहे. “लग्न झालेय पण मंगळसूत्र घालायचे राहिले” या टप्यावर निलेश लंके पक्ष प्रवेश विषय आहे.
काल गुरुवार निलेश लंके यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार लंके यांच्या “मी अनुभवलेला कोविड” या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विवेक कोल्हे यांच्या सोबतच नगर जिल्ह्यातील दादाभाऊ कळमकर,प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तात्या, अभिषेक कळमकर आदी अनेक नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार निलेश लंके यांचे कार्यकर्तेही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातच जयंत पाटील यांनी लंके यांना तुतारी भेट दिली आहे. त्याचबरोबर लंके यांना लोकसभा निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून जवळपास साडेचार लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्ह असलेले तुतारी घेतलेला माणूस आणि खाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असं हँड बॅनर लंकेच्या हातात देण्यात आले. एकूणच निलेश लंके यांनी जवळपास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनौपचारिक प्रवेश केल्याचं दिसून येत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे निलेश लंके थांबले असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत आज शुक्रवारी माध्यमांशी बोलताना लंके यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी आज शुक्रवारी आपण तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जात आहोत. मी देवी भक्त आहे. अनेक देवी मंदिरांना भेटी देत असतो. त्याचबरोबर तिथून आल्यानंतर येत्या तीन दिवसात सर्व कार्यकर्त्यांशी, सहकाऱ्यांशी चर्चा करून माझा जो काही निर्णय असेल त्याबाबत मी बोलेल असं लंके यांनी स्पष्ट केले आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक असते. यात सहा विधानसभा मतदारसंघ असतात. एकंदरीत पाहिलं तर यासाठी मोठी यंत्रणा लागते. सध्या ज्यांची चर्चा आहे त्यांच्याकडे कदाचित यंत्रणा असेल पण मी एक सर्वसामान्य माणूस आहे. संस्थेचे कर्मचारी कामासाठी या गावात त्या गावात पाठवावे लागतात. यासाठी यंत्रणा लागते पण माझ्याकडे असे काही नाही. मात्र सर्वसामान्य जनतेतून मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे येत्या पुढील तीन दिवसात याबाबत निर्णय होईल असे लंके म्हणाले. अजित पवार यांनी पक्षांतर केले तर कारवाई होईल, त्यामुळे निलेश लंकेनी राजीनामा दिला द्यावा असं वक्तव्य केलं होते. यावर बोलताना लंके यांनी अजित दादा माझ्या बाबतीत असं काही त्या अर्थाने बोलणार नाही. ते माझे नेते आहेत. त्यांनी मला खूप सहकार्य केलेले आहे. माझी राजकीय कारकीर्द धोक्या येईल असे ते काहीही करणार नाही, असा विश्वास निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केला.
मी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्य साठी जिल्हाभरातून अनेक नेते मंडळी उपस्थित होती. ही सर्व नेतेमंडळी विविध पक्षांची होती. मात्र मी आयोजित केलेला कार्यक्रम राजकीय नव्हता. तसेच आलेले सर्व पक्षांचे नेते राजकीय उद्देशाने नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रत्यक्षात अनुभूती मिळावी यासाठी त्या प्रेमापोटी आले होते. अर्थात मी आयोजक असल्याने त्यांनी माझ्याबद्दल दोन शब्द कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल व्यक्त केले. त्यात कुठलेही राजकीय भाव नाही असं स्पष्टीकरणही लंके यांनी यावेळी दिले.
दोन्ही “राष्ट्रवादी”ची विचारधारा एकच.. मग कसला पक्ष प्रवेश!!
प्रवेश हा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर म्हणता येतो, पण विचारधारा एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर यांची ही विचार धारा आहे. सामान्य, दिनदलित, काबाडकष्ट करणारा शेतकरी,मजूर, दिव्यांग, अल्पसंख्यांक, युवक, महिला सबलीकरण अशा घटकांना सोबत घेऊन काम करणारी ही विचारधारा आहे असे महत्वाचे विधान लंके यांनी यावेळी केले.