नगर:
लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर शनिवारी(16 मार्च) वाजला असून देशभरात 7 टप्यात मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर 4 जून रोजी एकाच वेळी देशभरातील 643 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडणार आहे. नगर जिल्ह्यात अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप कडून खा.सुजय विखे पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. तर महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पारनेरचे आ.निलेश लंके यांची उमेदवारी गृहीत मानली जात आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिणेत खा.सुजय विखे विरुद्ध आ.निलेश लंके अशी मुख्य लढत असेल.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. या ठिकाणी शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार असून खा.लोखंडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात गेलेले आहे. त्यामुळे फूट पडलेल्या शिवसेनेत शिंदे गटाचा दावा महायुती कडे करण्यात आलेला आहे. तर महाविकास आघाडीत शिर्डीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटा कडे आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेत 2008 ला शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव झाल्या नंतर 2009 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय आघाडी कडून रामदास आठवले यांच्यात लढत झाली. त्यात शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले. त्यावेळी आरपीआय अध्यक्ष असलेल्या रामदास आठवले यांचा झालेला पराभव धक्कादायक आणि आठवले यांच्या जिव्हारी लागणारा होता.
दरम्यान बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि समीकरणात रामदास आठवले युपीए आघाडीतून बाहेर पडत एनडीए आघाडीत मध्ये सहभागी झाले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना एनडीए मध्ये सहभागी होण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. या राजकीय समीकरणात सत्तेत असलेल्या राज्यातील महायुती मध्ये भाजप,शिवसेना एकनाथ शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राज ठाकरे यांची अनुमती असेल तर मनसे अशा प्रमुख चार राजकीय पक्षांपैकी एका पक्षाचा उमेदवार शिर्डी लोकसभेची जागा लढवू शकतो.
यात कळीचा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खा.सदाशिव लोखंडे दोन टर्म येथून खासदार असून त्यांच्या बद्दल नागरिकांत नाराजी असल्याचे विविध सर्व्हेतुन पुढे आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकतर एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलावा लागेल अथवा शिर्डी लोकसभा मतदारसंघ महायुतीतील इतर एखाद्या पक्षाला सोडावा लागणार आहे.
रामदास आठवले यांना 2009 चा पराभव जिव्हारी लागलेला असून त्यांनी पुन्हा एकदा शिर्डी मधून उमेदवारी मिळावी यासाठी आटापिटा सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे त्यांनी तशी मागणी केलेली आहे. तर आरपीआयचे कार्यकर्ते आठवले यांना महायुती कडून उमेदवारी न दिल्यास आरपीआय आपला उमेदवार नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उतरवले असा इशारा देत आहेत.
खा.लोखंडे यांच्यावर सर्व्हेतुन दिसून आलेल्या नाराजी मुळे भाजपने शिर्डीची जागा आपल्याकडे मागितली आहे. भाजप कडून माजी प्रशासकीय अधिकारी आणि भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष नितीन उदमले यांना उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे.
गेल्या काही दिवसां पासून मनसेचे नेते आणि शिवसेनेत असताना संपर्क प्रमुख राहिलेले बाळा नांदगावकर यांचेही नाव शिर्डी लोकसभा उमेदवारी साठी चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे यांचा नांदगावकर यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाचे म्हणजे विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांचीच उमेदवारी पुन्हा कायम राहावी आणि शिर्डीची जागा आपल्याकडे राहावी यासाठी एकनाथ शिंदे गटाने जोर लावण्यास सुरुवात केली आहे. स्वतः खा.लोखंडे आपण तिसऱ्यांदा शिर्डीतूनच उमेदवार असणार असल्याचे सांगत असून खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. यात निळवंडे कालव्याच्या कामांचा प्रामुख्याने उल्लेख केला जात आहे.
एकंदरीत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी अंतिम मानली जात असताना महायुतील शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मनसे अशा चार पक्षाकडून उमेदवारीची मागणी होऊ लागली असून या साठी खा.लोखंडे, नितीन उदमले, रामदास आठवले, बाळा नांदगावकर आदींची नावे चर्चेत येत आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी म्हणजे एक अनार सौ बिमार अशी परिस्थिती महायुतीत दिसून येत आहे.