नगर:(जामखेड प्रतिनिधी नासिर पठाण):
टायमिंग साधने ही कला राजकारण्यांना चांगलीच अवगत आहे. कुठे गाठीभेटी असतील, कार्यक्रमाची उपस्थिती असेल, व्यासपीठावर फोटो सेशन असेल, भाषणाची वेळ असेल या बरोबरच कुणाला भेटायचेच आणि कुणाला टाळायचेच.. अशा वेळी राजकारण्यांची ही कला लीलया प्रकट होत असते.. आणि ही आव्हाने नेते मंडळी विनासायास पार पाडतात हे मात्र निश्चित.
आता याची आठवण सहज यायचे कारण म्हणजे गुरुवारी जामखेड शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या खाऊगल्ली आणि प्रसिद्ध आशा भेळ या उपहारगृहाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास उपहारगृहाच्या संचालकांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित-नागरिक यांना निमंत्रण दिले होते.
या खाऊगल्ली दालनाचे उद्घाटन खा.सुजय विखे यांच्या हस्ते झाले. लक्षवेधी भाग म्हणजे कार्यक्रमाचे निमंत्रण आ.निलेश लंके आणि राणीताई लंके यांनाही देण्यात आले होते. तसे या कार्यक्रमाचे निमंत्रण आ.राम शिंदे आणि आ.रोहित पवार यांनाही होते. आता हे वाचल्यावर आपल्याला अंदाज आलाच असेल की अयोजकाने केलेले हे धाडस तसे मोठेच म्हणावे लागेल. आता राम शिंदे आणि रोहित पवार आले की नाही याची माहिती मिळू शकली नाही.
मात्र या कार्यक्रमास सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने असल्याने आणि अर्थातच चर्चेत असलेले सुजय विखे आणि राणीताई लंके येणार असल्याचा निरोप आयोजकांना आला. आता कदाचित हा निरोप आल्यानंतर खाऊगल्लीत काही खाऊन नव्हे तर उद्घाटना पूर्वीच आयोजकांच्या पोटात नक्कीच कळ मारली असणार. मात्र सुरुवातीलाच म्हंटल्या प्रमाणे टायमिंग साधण्याची कला ही अभिनेत्यांपेक्षा नेते मंडळींना असते याची प्रचिती थोड्या वेळात सर्वांनाच आली.
खा
. सुजय विखे आपल्या समर्थकांसह आले. आल्या-आल्या त्यांनी फित कापून खाऊगल्ली दालनाचे उद्घाटन केले. फर्मच्या संचालकांना सुजयदादांनी शुभेच्छा दिल्या, फोटोसेशन झाले आणि लागलीच सुजयदादा कार्यक्रमस्थळावरून चालते झाले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत राणीताई लंके खाऊगल्ली/आशा भेळ सेंटरच्या कार्यक्रमस्थळी आल्या आणि त्यांनीही शुभेच्छा दिल्या. एव्हाना त्यांना उद्घाटक येऊन गेल्याची माहिती त्यांच्या महितगार सूत्रांनी नक्कीच दिली असणार. आणि म्हणून आयोजकांनी खाऊगल्लीत आल्याचं आहात तर आता काहीतरी खावेच लागेल असा आग्रह झाला आणि त्यांनीही आता काही खायला काहीच “अडचण” नसावी असे वाटले असेल म्हणून की काय खाऊगल्लीतील पदार्थांवर अल्पसा ताव मारलाच.. एकूणच सर्व “कार्यक्रम” व्यवस्थित पार पडला असल्याची खात्री अयोजकांनाही आली आणि काही वेळा पूर्वी त्यांच्या पोटात आलेली कळही आपोआप शांत झाली.



