नगर:
दिवंगत वसंतराव झावरेंचा मोठा राजकीय वारसा, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे, युवकांचे प्रभावी संघटन, उच्च शिक्षणातून विकासाचे व्हिजन असे अनेक पैलू असतानाही सुजित झावरे यांना विधानसभा निवडणुकीत विजयाने आता पर्यंत हुलकावणी दिली आहे. 2019 ला शरद पवारांमुळे अनुकूल वातावरण होते पण पक्षाने सुजित झावरेंना उमेदवारी दिली नाही. मात्र आता लोकसभा निवडणुकानंतर काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभेला सुजित झावरेंना एक चांगली राजकीय परिस्थिती आपसूक निर्माण होत असून येणाऱ्या संधीचे सोने करून सुजित झावरे यांचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अशी परिस्थिती आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून आ.निलेश लंके नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. महायुती मधून संधी नसल्याने आणि कदाचित अगोदरच ठरले असेल म्हणून निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभ्या फुटी नंतर आ.लंके अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटा सोबत गेले. मात्र लोकसभा लढवायची असेल तर त्यांना अजित पवार यांची साथ सोडावी लागणार असून शरद पवार यांची तुतारी हातात घ्यावी लागणार आहे.
या परिस्थितीत आ.लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत गेल्यास विधानसभेला पारनेरची जागा महायुती कडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे आपसूक जाणार आहे. कारण मागील वेळी याठिकानाहून त्यावेळी एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. सुजित झावरे सध्या भाजप मध्ये आहेत. मात्र विधानसभा लढवायची असेल तर त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये जावे लागेल. झावरे यांचे अजित पवार यांच्यासोबत जवळचे संबंध राहिले आहेत. अजित पवारांनी झावरे यांना वारंवार संधी दिली होती, त्यामुळे प्राप्त परस्थिती निर्माण झाल्यास सुजित झावरे हेच अजित पवारांची पहिली पसंती असणार आहेत. जोडीला भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष,आरपीआय असे मदतीला असणार आहेत.
लोकसभेला सुजित झावरे यांची सुजय विखेंना किती मदत होणार आणि तशी मदत झाल्यास त्याची परतफेड सुजित झावरेंना तन-मन-दनाने करत विखे पिता-पुत्र दुसऱ्या अर्थाने “परतफेडी”ची संधी सोडणार नाहीत. एकूणच सुजित झावरेंना कधी नव्हे अशी अनुकूल परिस्थिती विधानसभेला येऊ शकते आणि ही संधी ते नक्कीच सोडणार नाहीत. मात्र त्यासाठी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती पावले टाकत आणि भविष्याचा विचार करत राजकीय फायद्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सुजित झावरे यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्ताने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते पुढील राजकीय दिशा देणारा निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे सुजित झावरे नेमका काय निर्णय घेताहेत या कडे अनेकांचे डोळे लागून असतील एव्हढे मात्र नक्की.