नगर:
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनांमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस असे तीनही पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.
या बैठकीस आमदार निलेश लंके उपस्थित होते का? याबाबत मोठे गूढ आणि गुप्तता ठेवण्यात आल्या बाबत राजेंद्र फाळके यांनी निलेश लंके बैठकीला उपस्थित नव्हते असे त्रोटक उत्तर दिले. मात्र उपस्थित कार्यकर्त्यात मात्र निलेश लंके बैठकीला उपस्थित होते अशी कुजबुज सुरू होती. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके वापरत असलेली कार राष्ट्रवादी भवनाच्या पॅसेज मध्ये उभी होती. राष्ट्रवादी भवनाच्या प्रीमायसेस मध्ये त्यांनी काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. याबाबत राजेंद्र फाळके यांनी काही कामानिमित्ताने ते आले असतील, माझीही त्यांच्याशी खाली भेट झाली, मात्र ते बैठकीला उपस्थित नव्हते अशी स्पष्टता फाळके यांनी दिली.
माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी त्यांना बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहू दिले गेले नाही. कोणत्याही प्रकारे व्हिडिओ कॅमेरा किंवा मोबाईल यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही अशी चोख व्यवस्था कधी नव्हे ती आज राष्ट्रवादी भवनामध्ये पहावयास मिळाली. माध्यम प्रतिनिधींना खाली तळघर मजल्यावरच थांबवण्यात आले होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे निलेश लंके बैठकीला उपस्थित असतील तर तेही माध्यमां समोर बोलतील या अपेक्षेने पत्रकार बराच काळ बैठक संपेपर्यंत ताटकळत थांबले होते. मात्र बैठक संपल्यानंतर लंके हे दुसऱ्या मार्गाने आणि दुसऱ्याच वाहनातून माध्यमांची नजर चुकवत निघून गेल्याची चर्चाही सुरू झाली होती. यावेळी काही माध्यमकर्मींनी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी मज्जाव करण्यात आल्याचं दिसून आले. एकूणच निलेश लंके या बैठकीस उपस्थित होते की नाही याबद्दल गुढ कायम ठेवण्यात आज महाविकास आघाडीला यश आल्याचे दिसून आले.
निलेश लंके सुरुवातीपासूनच लोकसभा निवडणूक लढवणार का किंवा कोणत्या पक्षाकडून आदींबाबत गुप्तता पाळत असून त्यांनी माध्यमांसमोर याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. कुठेतरी अजित पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर निलेश लंके आणि महाविकास आघाडी विशेष करून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट निलेश लंके यांच्यासोबतच्या गाठीभेटी छुप्या पद्धतीने घेत असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार निलेश लंके हेच लोकसभा निवडणूक लढवणार असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्याबद्दल अधिकृत स्पष्टता समोरील अशी माहिती समजत आहे.