नगर:(प्रतिनिधी नासिर पठाण):
राजकारणात परस्पर विरोध हा दोन पक्षातील नेत्यांत असो वा पक्षांतर्गत दोन नेते-गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत असो, तो कायमस्वरूपी कधीच नसतो. राजकारणाचा प्रदीर्घ सारीपाट पाहिला तर हे वारंवार दिसून आलेले आहे. आणि म्हणून अनेकदा म्हंटले जाते की राजकारणात कोणी कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. गेल्या दोन-अडीच वर्षाच्या राजकारणाकडे पाहिजे तर आता राजकारणात काय व्हायचे बाकी राहिलंय असे लोकं गमतीने म्हणतात.
नगर जिल्ह्यातीलच विचार केला तर दक्षिणेचे भाजप खा.सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. विशेष करून आ.राम शिंदे यांनी पक्षाकडे लोकसभेसाठी पुन्हा उमेदवारी मागत पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण ती लढवू असे स्पष्ट केले होते. मात्र भाजपच्या केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाने पुन्हा खा.सुजय विखे यांना संधी दिली. त्यानंतर साहजिकच राम शिंदे नाराज असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या. अर्थात 2019 ला राम शिंदे यांचा झालेल्या पराभवाची पार्श्वभूमी नाराजीला जोडली जात होती.
मात्र भारतीय जनता पक्षाचे एक वैशिष्ट्य आहे, पक्षांतर्गत कितीही मतभेद असले आणि वैयक्तिक इच्छा-अपेक्षा असल्या तरी त्या ठराविक पातळीपर्यंतच बोलल्या जातात. पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने एकदा निर्णय घेतला की सर्व मतभेद बाजूला ठेवून नेते-कार्यकर्ते कामाला लागतात. अशा वेळी पक्ष या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतो. नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. आणि त्यानां सर्व सुरळीत होऊन निवडणुकीला एकसंध पणे सामोरे जाण्याची परंपरा भाजप मध्ये दिसून येते. दिवंगत दिलीप गांधी यांना विद्यमान खासदार असताना दोनदा पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र त्यांनी शेवटी पक्षाच्या उमेदवाराचे काम करत पक्षशिस्त पाळली हे उदाहरण आहे. राज्यातीलही अनेक नेत्यांबाबतीत हे घडले गेले याची अनेक उदाहरणे माहीत असतील.
साहजिकच सुजय विखे यांची उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राम शिंदे नाराज असल्याच्या पेरलेल्या बातम्या माध्यमांनी चालवल्या. मात्र यावर सुजय विखे यांनी काही चुका झाल्या असतील तर त्यावर
क्षमा वीरस्य भूषणम् या उक्ती प्रमाणे जाहीर माफी मागण्याचा दाखवलेला दिलदारपणा, पालकमंत्री असले तरी राम शिंदे यांच्या निवासस्थानी जात केलेल्या चर्चेतून दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि राज्याचे शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विखें-शिंदे यांची झालेली भेट यातून जे सार पुढे आले ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि पक्षाने यावेळी दिलेला 400 पारचा नारा पूर्ण करण्यासाठी नगर दक्षिणेचा खासदार भाजपचाच असेल अशी ग्वाही आ.राम शिंदे यांनी दिली.
आता कालच मंगळवारी जामखेड मध्ये नव्याने सुरू झालेल्या खाऊगल्ली या ठिकाणी राम शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्थिती विचारली असता त्यांनी निसंदिग्ध शब्दात पक्षाने खा.डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यानुसार पक्ष कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या तालुकास्तरावर बैठकांचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले. आजच उमेदवार खा.सुजय विखे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माझी(राम शिंदे) एकत्रित बैठक असून त्यात बैठकांचे नियोजन,प्रचाराची रूपरेषा ठरवली जात असल्याचेही राम शिंदे यांनी सांगितले. अर्थात कळीचा प्रश्न विचारणार नाहीत ते पत्रकार कसले.. नेत्यांत मिटलं, आमचं नाही मिटलं, अशा प्रतिक्रिया असल्याबद्दल विचारले असता, कार्यकर्ते भारती जनता पक्षाचेच आहेत, मीही भारतीय जनता पक्षाचाच आहे आणि उमेदवार विखे हेही भारतीय जनता पक्षाचेच आहेत, त्यामुळे घरातील भांडण घरातच मिटेल अशी ग्वाही दिली. त्यामुळे माध्यमातून रंगवलेला विखे-शिंदे वाद हे एक पेल्यातील वादळ ठरले आहे. आ.राम शिंदे यांनी दिलेली ग्वाही, विखे पितापुत्रांसोबत सुरू केलेल्या बैठकांचे सत्र पाहता आता भाजप एकसंध पणे प्रचाराला सुरुवात करणार असे दिसून येत आहे.