नगर:
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याबाबत भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मतदारसंघात माझ्या उमेदवारीला चांगले वातावरण असून यावेळी चांगली लढत देऊन निवडून येणार आणि भविष्यात जनतेसाठी आणि पक्षासाठी अहोरात्र काम करणार अशी प्रतिक्रिया वाकचौरे यांनी न्यूज नगरीशी बोलताना दिली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी घोषित केली असली तरीही महायुतीकडून अद्याप कुणाला उमेदवारी मिळणार याबद्दल स्पष्टता आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन दिवसापूर्वीच आपली उमेदवारी अंतिम झाली असून आपल्याला कामाला लागण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं सांगितलं आहे. मात्र त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन उदमले यांनीही शिर्डी लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याचे संकेत दिले आहेत. याबद्दल वाकचौरे यांना आपल्या समोर अद्याप कोणताही उमेदवार किंवा पक्ष स्पष्ट नसल्याबद्दल विचारले असता वाकचौरे यांनी, समोर कोणीही असले तरी काही फरक पडणार नाही, माझी संपूर्ण तयारी झाली असून मी प्रचाराला केव्हाच सुरुवात केली असल्याचं सांगितले, जनता मलाच पुन्हा निवडून देईल असेही वाकचौरे म्हणाले.
महाविकास आघाडीचे तीनही पक्ष या निवडणुकीत एकत्रित आणि एक दिलाने काम करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरेत वर्चस्व असलेले बाळासाहेब थोरात माझ्या पाठीशी भरभक्कमपणे उभे असून त्यांच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कामाला सुरुवात केली आहे असं सांगितले. माझ्या विजयात थोरात साहेबांचा मोठा हातभार असेल असे वाकचौरे म्हणाले.
नगर उत्तरेत विखे परिवारा बद्दल भारतीय जनता पक्षांमध्येच पक्षातील काही नेत्यात नाराजी असल्याचं चित्र आहे, त्याचा फायदा आपणाला होईल का? असं वाकचौरे यांना विचारलं असता त्यांनी, याबद्दल आत्ताच निश्चित काही सांगू शकत नाही. पण निवडणूक काळात जे काही आहे ते स्पष्ट होईल अशीही जोड वाकचौरे यांनी यावर दिली.