नगर:
राज्यातील मध्यवर्ती असलेला आणि भौगोलिक विस्ताराने सर्वात मोठा असलेला जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यात अहमदनगर आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ असून महत्वाच्या राजकीय पक्षांनी एव्हाना शिर्डी लोकसभेसाठी मुख्य लढत होणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित केली आहे. नगर दक्षिणेत मात्र विखेंचा भिडू कोण यावर गूढ कायम आहे. शिर्डीत कदाचित वंचित कडून उमेदवार जाहीर होऊ शकतो, तशा हालचाली सुरू आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अनेकदा जाहीर मागणी आणि इच्छा व्यक्त करूनही एनडीए मधून त्यांची उमेदवारी डावलल्याने जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्ते नाराज झाले असून दिलेल्या इशाऱ्यानुसार एखादा कार्यकर्ता आपली अपक्ष उमेदवारी शिर्डीतून दाखल करू शकतो, मात्र ही नाराजी केवळ प्रातिनिधिक राहून नंतर दाखल अर्ज मागेही घेतला जाण्याची शक्यताच अधिक असणार आहे.
सद्य स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेत आपल्या पहिल्या 17 उमेदवारांची घोषणा केली आणि त्यात शिर्डीतून अपेक्षेप्रमाणे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी घोषित केली. तत्पूर्वी अहमदनगर दक्षिणे मधून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील यादीत विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे शिर्डीत वाकचौरेंचा भिडू कोण असणार आणि नगर दक्षिणेत सुजय विखेंसमोर कोण भिडू असणार याची उत्सुकता लागून होती. आता यात शिर्डीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर शिर्डीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर नगर दक्षिणेत संभाव्य भिडूचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.
2014 आणि 2019 असे सलग खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे यांना शिर्डीतून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यांची उमेदवारी महायुतीमध्येच अनेकांना धक्कादायक मानली जात आहे. भाजपसह विविध पातळ्यांवर केलेल्या सर्व्हेत लोखंडे यांच्या बद्दल मतदारसंघात मोठी नाराजी असल्याचे आणि त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे रिपोर्ट बद्दल मोठी चर्चा झाली. त्यामुळे शिर्डीतून उमेदवार बदलला जाणार, कदाचित भाजप कडून धक्कातंत्राचा वापर करत नवीन नाव देत उमेदवाराची घोषणा होणार अशीही मोठी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र महायुतीत अखेर शिर्डीची जागा सदाशिव लोखंडे यांनाच दिली गेली असून होणारी मुख्य लढत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांच्यात होईल असे चित्र स्पष्ट झाले आहे.
आता राहिला विषय तो अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे यांच्या समोर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार? यासाठी पारनेरचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत विखेंना टक्कर देणार अशी एकूण परस्थिती स्पष्ट असली तरी निलेश लंके यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झालेला नाही. आणि याबाबत माध्यमातून बातम्या आल्यानंतर निलेश लंके आलेल्या बातम्या या वावड्या असल्याचे एकीकडे सांगतानाच दुसरीकडे राजकारण कधीही कोणत्या वळणावर बदलत असते असे आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे लंके नेमका काय निर्णय घेणार याचे गूढ कायम आहे. लंके स्वतः निवडणूक लढवणार की काही तांत्रिक अडचण नको, आमदारकी धोक्यात येऊन पक्षांतर कायद्याचा फटका बसायला नको म्हणून पत्नी राणीताई लंके यांना पुढे करणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. लवकरच यावर लंके अंतिम निर्णय घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे शिर्डीत वाकचौरे यांना लोखंडे यांच्या रूपाने लढण्यासाठी भिडू मिळाला असला तरी नगर दक्षिणेतून सुजय विखे यांच्या समोरचा भिडू कोण? असा प्रश्न कायम असून निलेश लंके यांचे सुरू असलेले तळ्यात-मळ्यात यामध्ये याचे उत्तर दडलेले आहे.