नगर:
लढणार लढणार..शरद पवार गटात प्रवेश करणार करणार..राजीनामा देणार देणार.. अशी अनेक गूढ सोबत ठेवत आ.निलेश लंके यांनी गेल्या महिनाभर माध्यमांचा फोकस आपल्यावर ठेवण्यात यश मिळवले. समोर भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार घोषित झालेला असतानाही लंके आपली झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणी प्रमाणे माध्यमांसमोर बोलत होते. हे गूढ कायम ठेवण्या मागे एकीकडे चर्चेत राहत पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात न सापडता धोरणात्मक निर्णय घेण्याची योग्य वेळ साधण्याची लंके यांनी वाट पाहिली.
दरम्यान भाजप उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटीलही काही मागे नव्हते. त्यांनी कॅमेरा फोकस टाळत थेट नगर दक्षिणेच्या ग्राउंड असलेल्या सातही तालुक्यातील पक्ष संघटन आणि स्वतःची यंत्रणा यांचे एकत्रीकरण करत सर्वांच्या बैठका घेत कामाला सुरुवात केली होती. जाहीर प्रचाराच्या सभा न घेता इतर कारणास्तव असलेल्या कार्यक्रमांत उपस्थिती लावत आपली भूमिका जनते समोर मांडण्याचे काम सुजय विखे यांचे सुरू होते. त्यामुळे निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवणारच हे स्पष्ट असले तरी लंके कायद्याचा अभ्यास करत आमदारकी वाचवता येत काय पर्याय निवडावा यासाठी कायदेशीर सल्ला घेत आणि उमेदवारीचे गूढ कायम ठेवत होते.
अखेर निलेश लंके यांनी शुक्रवारी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक सुप्यात बोलावली. या बैठकीला महायुती मधील काँग्रेस-शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते. समोर उपस्थित जनसमुदाया समोर लंके यांनी जवळपास दोन तासांवर आपल्या भावना भाषणातून मांडल्या. यात विखे परिवाराकडून झालेला त्रास आणि अडवणूक, राष्ट्रवादी मधील फुटी नंतर अजित पवारांसोबत जाण्यामागची भूमिका, आणि आपले दैवत शरद पवार साहेब हेच असल्याने आपण राष्ट्रवादी मधेच होतो असे सांगत लोकसभा निवडणूक लढवण्यामागचे कारण लंके यांनी विशद केले. विखे यांनी अनेकदा त्रास दिल्याने ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी अनेकांनी मला आग्रह केला आणि मीही निश्चय करून मग होईल ते होईल लोकसभा लढवायचीच असा निर्णय घेतला, आणि कायदेशीर तांत्रिक बाजूंचा सखोल अभ्यास करून अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आता नगर दक्षिणेचा खरा डॉन कोण हे 4 जूनला जनताच दाखवून देईल असेही टाळ्यावसुल प्रचारसभेला साजेसे वक्तव्य निलेश लंके यांनी केले. अनेकदा ते भाऊकही झाले आणि जनतेला साथ देण्याची साद घातली.
आता निलेश लंके यांच्या राजींनाम्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. आज शनिवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होणार असून त्यात निलेश लंके हे नाव अंतिम झाले आहे. घड्याळ चिन्ह असलेला पंचा खांद्यावरून जात तुतारी चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीचा पक्षीय पंचा त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या हस्ते गळ्यात घेतला आहे. त्यामुळे आता नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात विखे विरुद्ध लंके लढत स्पष्ट झाल्याने निवडणुकीतील खरी रंगत सुरू झाली आहे.