नगर:
पक्ष विचारधारा, निष्ठा, समाजकारण, राजकारण आणि सत्ता या उतरंडीवर राजकीय पक्ष चालण्याचा काळ संपलाय अशीच परिस्थिती आहे. आता शॉर्टकट सत्ताकारण आले आहे. यात फक्त फोडाफोडी आणि त्यासाठी खोक्यांचा वापर ही गोष्ट सर्वश्रुत झाली आहे. वानगी दाखल कोणताही विधानसभा वा लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर आणा आणि तेथील विद्यमान, आजी-माजी, इच्छुक उमेदवार आणि त्यांचा राजकीय इतिहास तपासा. मोजके अपवाद वगळता आपल्याला जागोजागी अनेक “पलटूराम” दिसतील. या पार्श्वभूमीवर सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिर्डी लोकसभा मतदारसंघात एक नाव चर्चेत आलेय आणि ते म्हणजे उत्कर्षा रुपवते यांचे!! आणि हे नाव केवळ चर्चेतच न येता ज्या दोन बलाढ्य उमेदवारांत लढत होणार अशा ठाकरे शिवसेनेचे मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे शिवसेनेचे विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांच्या गोटात खळबळ उडालीय अशी चर्चा आहे.
अकोल्याचा रुपवते परिवार आणि काँग्रेस पक्ष हे एक तीन पिढ्यांचे समीकरण. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील राजकारणात आणि काँग्रेस वर्तुळात दिल्लीत दादासाहेब रुपवते, पुढे प्रेमानंद रुपवते यांची नावे वजनदार राहिली ती काँग्रेस पक्षाप्रती असलेल्या एकनिष्ठतेने. केवळ मागाससमाजातच नव्हे तर रुपवते परिवाराचे समाजकारण हे समाजातील सर्व विशेषतः वंचित,दुरबल घटकांशी जोडलेले राहिले. सत्तेच्या राजकारणात जास्त न पडता पक्षाकडे असलेल्या सत्तेच्या ताकतिचा वापर शिक्षण, आदिवासी विकास, महिला सबलीकरण यासाठी वापरून खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचे विचार पुढे नेण्याचे काम केले.
एकूणच नगर जिल्ह्यात मोठी राजकीय ओळख असूनही निवडणुका आल्या की रुपवते कुटुंबाला अपवादानेच संधी मिळाली. याबद्दल नाराजी व्यक्त केली गेली तरी पक्षाने विनंती केल्यावर पक्षादेश मानून माघार घेण्याचे काम आतापर्यंत केले गेले. मात्र काळाच्या ओघात सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा एकूणच बाज पाहता पक्ष निष्ठे ऐवजी दलबदलू लोकांनाच जर वारंवार संधी दिली जात असेल तर आपले काय? असा प्रश्न रुपवते कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उत्कर्षा रुपवतेना पडला असेल आणि त्यासाठी त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असेल तर यात नेमके दोषी कोण असा महत्वाचा प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुक घोषित झाल्यानंतर काँग्रेस कडे असलेली जागा मविआ मधील शिवसेनेकडे गेली. बाळासाहेब थोरातांनी प्रयत्न केलेही असतील पण ते पुरेसे पडले नाहीत. मात्र यात पुन्हा एकदा रुपवते कुटुंबावर अन्याय होणार असेल तर उत्कर्षा रुपवते यांनी या अन्यायाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मतदारसंघात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. वाकचौरे-लोखंडे या उमेदवारांबद्दल जनतेमध्ये नाराजीचा सूर यासाठी आहे की आपल्या राजकीय फायद्यासाठी या उमेदवारांनी दोनदोन-तीनतीन पक्ष बदलल्याचा इतिहास आहे. त्यामुळे विचारधारा, निष्ठा जपत आलेल्या रुपवते कुटुंबातून जर यंदा एल्गार पुकारला जाणार असेल तर जनतेचाही त्याला पाठिंबा मिळताना दिसत आहे. आणि एकूणच या परिस्थितीत उत्कर्षा रुपवते या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असल्याने जाहीर झालेल्या उमेदवारांत नक्कीच आतापासून धडकी भरली असल्याची जोरदार चर्चा आणि परस्थिती दिसून येत आहे. आता याबाबत उत्कर्षा रुपवते उमेदवारीवरून असलेली नाराजी जाहीर प्रकट करत असतानाच त्यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. आपली पुढील भूमिका आणि निर्णय येत्या तीन दिवसांत जाहीर करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जर उत्कर्षा रुपवते लोकसभेच्या मैदानात उतरल्यास त्यांना नव्हे तर इतर दोन उमेदवारांना त्यांच्याशी “फाईट” करावी लागेल इतका प्रतिसाद मतदारसंघातुन पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. लोखंडे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शिर्डीच्या लढतीत “मजा नाही राहिली” अशी प्रतिक्रिया समोर येत असतानाच आता उत्कर्षा रुपवते यांचे नाव चर्चेत येताच “अब होगी काटें की टक्कर” म्हणत वाकचौरेंपुढे आता खरे आव्हान उभे राहणार या गावगप्पांनी जोर धरला आहे.