नगर:
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि महायुती 2024 चे उमेदवार सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली. या व्हायरल क्लिप मध्ये असलेल्या दोन व्यक्तींमधील एक व्यक्ती पारनेर पंचायत समितीचा माझा माजी सदस्य निवृत्ती घाडगे असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत निवृत्ती घाडगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून आपला खुलासा माध्यमांकडे पाठवताना आपला या ऑडिओ क्लिप्स ची कोणताही संबंध नसल्याचं तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे त्यांनी या व्हिडिओ क्लिप मध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे.
या अनुषंगाने पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतलेली असून याबाबत आरोप प्रत्यारोप खुलासे प्रतिखुलासे सुरू असले तरीही पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे समोर येत आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला शिवीगाळ करतानाच थेट गोळ्या घालण्याची भाषा करणारी व्यक्ती कोण? या व्यक्तीचा संवाद कोणाशी झाला? त्याचबरोबर हा संवाद होत असताना दोन्ही बाजूंनी कोणकोणत्या व्यक्ती उपस्थित होत्या? या सर्वांची शहानिशा पोलिसांना करणे अगत्याचे आहे. लोकसभेतील एक लोकप्रतिनिधी याला अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या घालण्याची भाषा असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना पोलिसांनी याबाबत आता गंभीरपणे पाऊल उचलले असून या व्हिडिओ क्लिप शी संबंधित चर्चेत असलेली निवृत्ती घाडगे या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे समोर येत आहे.
याबाबत पारनेर पोलिसांशी संपर्क साधला असता ठाणे अमलदार यांनी अशी कोणतीही अटक किंवा ताब्यात घेतल्याची घटना नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला,.अर्थात पारनेर तालुक्यात दहशत आणि भीतीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे त्याच अनुषंगाने पारनेर पोलीसही कुठे दहशतीत आहेत का असाच कुठेतरी भास यानिमित्ताने होत आहे!! वास्तविक संबंधित प्रकरणातील संशयित व्यक्ती हजर झाली असेल किंवा त्याला ताब्यात घेतले असेल आणि त्याची चौकशी सुरू असेल तर याबाबतची प्राथमिक माहिती ठाणे अंमलदार यांना निश्चित असते. मात्र अशी कोणतीही माहिती देण्याचे धाडस आज सकाळी पारनेर पोलीस करू शकत नव्हते हे दिसून आले. मात्र पोलीस सूत्रांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार निवृत्ती घाडगे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. अधिकची माहिती पोलीस कंट्रोल रूम कडून घ्या असाही सल्ला पारनेर पोलीस देत होते. याबाबत पोलीस सावधान पणे पावले उचलत असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे दिसून येत आहे.