नगर:
नगर आणि बीड जिल्हा एकमेकाला लागून आहे. बीड जिल्ह्यातील आणि नगर दक्षिण मतदार संघातील अनेक प्रश्न एकत्रितपणे सोडवणे गरजेचे आहे, कारण या दोन्ही भागातील जनतेचा संबंध एकमेकांशी सातत्याने येत असतो आणि त्यामुळे बीडमधून आमच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना तर नगर दक्षिणेतून मला (सुजय विखे) आम्हा दोघांना येत्या 13 मे रोजी कमळाचे बटन दाबून मतदान करून प्रचंड मताधिक्याने जिंकून द्यावे असे आवाहन महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
नगर आणि बीड या दोन्ही भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या मोठ्या भगिनी पंकजाताई आणि त्यांचा हा छोटा भाऊ सुजय विखे आम्ही दोघे मिळून संसदेत या भागातील प्रश्न तडीस नेऊ असे आश्वासन सुजय विखे यांनी यावेळी दिले. पंकजा मुंडे यांचा मोठा जनसंपर्क ओबीसी समाजाच्या नेत्या या नात्याने नगर जिल्ह्यात आहे, त्याचबरोबर विखे परिवाराचाही साखर उद्योगाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये मोठा संपर्क आहे. त्याचबरोबर बीड आणि नगर जिल्ह्याचा दक्षिणेतील पट्टा हा नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहिलेला आहे.
या अनुषंगाने सुजय विखे यांनी 13 तारखेला माझ्यासह आमचा नेत्या पंकजा मुंडे यांनाही भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन केल्याचे दिसून येत आहे. नुकतेच पंकजा मुंडे यांनी पुण्यावरून बीड कडे जाताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी सुजय विखे आणि भाजप नेत्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांनी मोठ्या मताधिक्याने सुजय विखे यांना विजयी करा असे आवाहन केले होते. पंकजा मुंडे यांची पाथर्डी परिसरात लवकरच जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे.