शरद पवार यांचा शेवगाव मधील सभेत केंद्र सरकारला प्रश्न
नगर:
गुजरातच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिली त्याबद्दल काही हरकत नाही, मात्र महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं होतं म्हणून त्यांच्यावर परदेशात आणि इतर राज्यात कांदा निर्यात बंदी कायम ठेवली असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
शेवगाव येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आ.प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे आदी उपस्थित होते.
पवार यांनी, नरेंद्र मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा सांगताना त्यांनी साखर उद्योगात अनेक बंधने आणली आहेत. साखरेचे दर, इथेनॉल निर्मिती यावरील बंधनांमुळे राज्यातील साखर कारखानदारी धोक्यात आल्याचे पवार म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याचे पवारांनी यावेळी सांगितलं.
कोरोना काळामध्ये निलेश लंके यांनी 28 हजार रुग्णांवर आपले हिमतीवर उपचार करून त्यांना बरे केले. कोरोनामुळे मुंबईमधून अनेक परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात पायी, मिळेल त्या वाहनातून अनंत त्रास सहन करत जात असताना लंके यांनी मदत केली. मात्र त्याच वेळी काही लोक घरात बसून राहिले. राज्य सरकार म्हणून काही काम झाले नाही, ज्यांची सत्ता राज्यात आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं अशी टीका विखे यांचे नाव न घेता शरद पवार यांनी यावेळी केली.
शेवगाव तालुक्यामध्ये प्रलंबित ताजनापूर पाणी योजना, एमआयडीसी होणे गरजेचे आहे. हे झाल्यास येथील परिस्थिती बदलेल अशी आशा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारला लोकशाहीवर विश्वास नाही आणि त्यामुळेच त्यांनी ग्रामपंचायती पासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित ठेवून मतदारांना आपला हक्क बजावण्यास प्रतिबंध केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, कोणालाही घाबरू नका. तुम्हाला वाटेल समोरची मोठी पार्टी आहे. ती नंतर आपल्याला त्रास देईल. पण एक सांगून ठेवतो तुम्ही त्यांना मत द्या किंवा नका देऊ ते तुम्हाला त्रास देणारच आहे. त्रास देणे हा त्यांचा पिंड आहे. त्यामुळे पुढाऱ्यांनी पण हे लक्षात ठेवावं आणि निलेश लंके यांनाच मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून निवडून द्यावं असा आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.