नगर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांसाठी देशभरातून मोठी मागणी असून मोदींची सभा म्हणजे विजयाचे गणित आणि मोठ्या मताधिक्याची शाश्वती असे समीकरण आल्याचा विश्वास भाजप महायुती उमेदवारांना आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा सध्या धडाका सुरू असून महायुतीच्या जवळपास सर्वच उमेदवारांसाठी त्यांच्या सभा सुरू आहेत. विशेष म्हणजे मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी जमत असल्याने उमेदवारांचा उत्साह दुनावल्याचे दिसून येत आहे.
नगर जिल्ह्यातील महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आणि शिर्डी राखीव मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे दोघेही विद्यमान खासदार आहेत. विखें समोर मविआचे निलेश लंके आणि लोखंडे यांच्या समोर भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्षा रुपवते यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील लढत रंगतदार आणि लक्षवेधी ठरत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगर शहरात 7 मे रोजी महायुतीचे सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
2014, 2019 प्रमाणेच नगर येथील संत निरंकारी महाराज पटांगणात पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने यावेळी गर्दीचे उच्चांक मोडल्याचे बोलले जात आहे. या सभेला जिल्हाभरातून लाखभर लोकं उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र विविध एजन्सीच्या आकडेवारी नुसार मंगळवारी पार पडलेल्या सभेस लाखापेक्षा अधिक संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. यात नगर दक्षिणेतील नागरिकांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले. नगर शहरासह पारनेर,श्रीगोंदा, कर्जत,जामखेड,पाथर्डी,राहुरी,शेवगाव या सर्वच तालुक्यातून मतदार-नागरिक उत्साहाने सभेस उपस्थित होते. यात युवक-युवती, नवंमतदार, जेष्ठ महिला-पुरुष नागरिक, असे सर्व वयोगटातील नागरिक अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने उपस्थित असल्याने महायुती मधील उमेदवार, नेत्यांत उत्साह दुणावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही 2014, 2019 प्रमाणेच कायम असल्याने यंदाही लोकशाही मधील निवडणुकीच्या उत्सवात नागरिक मोदींच्या सभांना मोठी गर्दी करत असल्याचे चित्र राज्यासह देशभर असून त्याचीच प्रचिती नगर मधील सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिसून आले आहे. निश्चितच मोदींच्या सभे नंतर महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र असून मोदींची सभा केवळ विजयश्रीच नव्हे तर मताधिक्याचे जुने रेकॉर्ड तोडण्याचे काम करेल असा विश्वास महायुतीला आहे.
गेल्या पाच वर्षात केलेली हजारो कोटींची विकासकामे, केंद्र सरकारच्या योजनांचा पाठपुरावा करत नागरिकांना मिळवून दिलेला फायदा, शेतकरी, उद्योजकांना मोठा दिलासा देता आल्याने मतदार पुन्हा आपल्यालाच संधी देतील अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची जगात घोडदौड सुरू असून भारताला महासत्ता बनवण्यासाठी मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. आता पर्यंतच्या प्रचारात मतदारांनी आपणाला भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता आपला विजय केवळ औपचारिकता राहिली असल्याचा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या फरकाने आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.