पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त करत केले विखेंना विजयी करण्याचे आवाहन
नगर:
माझ्या जिल्ह्यात जातीयवादाचे विष पेरले जात असून मला धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरीही मी माझ्या सुजय विखे या मराठा भावाच्या प्रचाराला आले आहे. याची नोंद माझ्या जिल्ह्याने घ्यावी, अशी खंत वजा भावना व्यक्त करत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने निवडणून देण्याचे आवाहन केले.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे आयोजित सभेत महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भर पावसात हवामान धोकादायक असताना जीव धोक्यात घालून हेलिकॉप्टरने सभेला आल्याचे सांगितले. मी राधाकृष्ण विखे यांना शब्द दिला होता आणि तो मी पाळला. भाजप जात-पात मानत नाही, सर्वांना सोबत घेत माझा पक्ष पुढे जातो. हे सांगताना मुंडे यांनी बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जातीय प्रचारावर बोट ठेवले आणि सुजय विखे यांच्या प्रचाराला आल्याचे स्पष्ट केले. यावेळी उमेदवार खा.सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजीमंत्री शिवाजी कर्डीले, आ.मोनिका राजळे, माने,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे आदी उपस्थित होते.