भाजपच्या चित्रा वाघ यांचा गर्भवती महिलेला मारहाण प्रकरणात खा.लंके आणि राहुल झावरेंना खोचक शब्दात इशारा देत सुप्रिया सुळेंवर निशाणा..
नगर:
नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहूल झावरे यांनी राक्षसी पध्दतीने विजय साजरा करण्यास केलेली सुरूवात ही सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण असून, “मोठ्या ताई” त्यांना शिक्षा देणार की पाठीशी घालणार ॽअसा खोचक सवाल भारतीय जनता पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. हा सवाल त्यांनी खा.सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता विचारला आहे.
पारनेर तालुक्यातील दलित समाजातील महीलेस निलेश लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जावून जातीवाचक शिवीगाळ आणि पोटात लाथा मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच राहुल बबन झावरे यांना पारनेर शहरात माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी आणि सोबत असलेल्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या दोन्हीही घटनेचे तीव्र पडसाद पारनेरसह जिल्ह्यात आणि राज्यात उमटत आहेत.
गोरेगाव इथे सुजय विखे समर्थकाच्या घरावर हल्ला आणि मारहान-धमकीच्या घटनेबाबत भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात खा.निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी पध्दतीने आपला विजय साजरा करीत आहे असे म्हणत महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून हल्ले करणार्या लंके समर्थकांना ‘मोठी ताई’ पाठीशी घालणार की शिक्षा देणार असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीतील विजय पचवता आला पाहीजे आणि मिरवताही आला पाहीजे,सत्तेची हवा आणि माज इतका डोक्यात गेला असेल तर शिवरायांच्या पावनभूमीत तो कधीही सहन केला जाणार नाही. जिजाऊंच्या लेकीच औरंग्याच्या अवलादींना धडा शिकवतील असा इशारा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला आहे.