नगर:
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्व छोट्या-मोठ्या पक्षांना लागले आहेत. यात सत्तेतील महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील दोन्ही बाजूंच्या प्रमुख तीन-तीन पक्षात आपल्याच पक्षाला जास्तीतजास्त जागा लढवण्यासाठी मिळाव्यात यासाठी रणनीती आणि मित्रपक्षांवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे पूढे येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता महायुतीतील पक्षांची धाकधूक वाढली आहे तर महाविकास आघाडीतील पक्षांचा विश्वास दुणावला आहे. यात फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातून विधानसभेसाठी 80 ते नव्वद जागांची मागणी पुढे येताना दिसत आहे.
याची सुरुवात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून प्रथम झाली. लोकसभेला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागा महायुतीकडून सोडण्यात आल्या. त्यातील रायगड मध्ये सुनील तटकरे वगळता इतर तीन ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले. चर्चेत राहिलेली प्रतिष्ठेची बारामतीची जागा अजितदादांना जिंकता आली नाही. त्यांच्यासाठी पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव हा मानहानीकारक मानला जातोय. त्यामुळे केवळ चारच जागा मिळाल्याने पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेला कमी जागा स्वीकारल्या असल्या तरी महायुतीत सामील होताना दिलेल्या शब्दा प्रमाणे 80-90 जागा विधानसभेला मिळायला हव्यात म्हणजे 50-60 आमदार निवडून येतील अशी मागणी भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीत केली. त्यांच्या मागणीनंतर महायुतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. 80 काय 100 जागा मागा पण महायुतीअंतर्गत बैठकीत मागा, जाहीर वक्तव्य करू नका असे संजय शिरसाठ यांनी सुनावले आहे. तरीही भुजबळ यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा आम्हालाही मिळायला हव्यात अशी मागणी केली. दोन-तीन दिवसांपूर्वीच मंत्री अनिल पाटील यांनीही अजित पवार राष्ट्रवादीला 80 जागा विधानसभा लढण्यासाठी मिळाल्या पाहिजे अशी मागणी केली आहे. लोकसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा देत राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी सभा घेतल्या. या ठिकाणी त्या उमेदवारांना विजय मिळाला. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अशात मनसे महायुती मध्ये सहभाही झाल्यास जागांची रस्सीखेच वाढणार आहे.
दुसरी कडे महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील खासदारांनी पक्षाचे 85 आमदार निवडून देत राष्ट्रवादीचा झेंडा विधानसभेवर फडकला पाहिजे असे जाहीर वक्तव्य केले आहे. 85 जागा निवडून आणण्याचे टार्गेट असेल तर त्यासाठी शंभरावर जागा लढवाव्या लागतील. एकट्या राष्ट्रवादीला एवढया जागा ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस देणार का? इतर छोट्या घटक पक्षांचे काय हाही प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन नगर मध्ये पार पडला. यावेळी खा.अमोल कोल्हे, खा.निलेश लंके, खा.बजरंग सोनवणे आदींनी पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस असल्याने या निमित्ताने त्यांना भेट म्हणून पक्षाचे 85 आमदार विधानसभेत निवडून पाठवायचे असा निर्धार व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसचे 13 अधिक सांगलीतून विशाल पाटील असे 14, ठाकरे शिवसेनेचे 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार असे उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठे यश मिळाल्याने सगळ्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष मविआतुन जास्तीतजास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी सरसावले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर काँग्रेस लोकसभेत मिळालेल्या यशाने अधिक जागांची दावेदारी बोलून दाखवली आहे. लोकसभेला अजून जास्त जागा मिळायला हव्या होत्या असाही सूर काँग्रेसचा आहे. तसेही शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटी नंतर महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा पक्ष बनला आहे तर आता लोकसभेच्या 13+1 असे 14 खासदार असल्याने काँग्रेसची जागांची दावेदारी वाढणार आहे. 2019 ला महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेना मोठा पक्ष असल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. जरी पक्ष फुटला असला तरी लोकसभेला ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेची ताकत दाखवून दिली आहे. त्यामुळे सर्वात अधिकच्या जागांसाठी ते निश्चितच आग्रही असणार. मविआला राज्यात अनुकूल वातावरण असल्याने जास्तीतजास्त जागा मिळवून जिंकल्यातर मुख्यमंत्री पदावर दावा आणि जास्त मंत्रिपदांची मागणी करता येण्याची रणनीती यामागे सर्वच पक्षांची दिसून येत आहे.
एकूणच लोकसभेला काहीसे अपयश मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत ही भर काढून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी लोकसभे प्रमाणे आम्ही विधानसभेला कमी जागा घेणार नाही असा संदेश मित्र पक्षांना देण्यास सुरुवात झाली आहे. तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवून सर्वोत्तम स्ट्राईकरेट असल्याचे सांगत आणि शरद पवारांना 85व्या वाढदिवसाची भेट म्हणून पक्षाचे 85 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला जात असल्याने दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेसाठी जास्तीतजास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आता सरसावल्या असल्याचे दिसून येत आहे. मात्र या जागांच्या मागण्या केल्याने सत्तेत येण्याच्या स्पर्धे आधी जागावाटपाची स्पर्धा अधिक रंगणार अशीच शक्यता दिसत आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे या जागा वाटपावरून दोन्ही बाजूंनी नवनवे ट्विस्टही पाहायला मिळणार हे निश्चित.