..नंतर मला त्या व्यक्तीची पार्श्वभूमी समजली.. एक्सिडेंटली झालेली ही घटना चूकच आहे -खा.लंके यांचा खुलासा..
नगर:
नवनिर्वाचित खा.निलेश लंके यांची पुण्यात शुक्रवारी रात्री कुख्यात गुंड गजा मारणे याच्या सोबत झालेली भेट आणि गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्यानंतर आता खा.निलेश लंके चांगलेच वादात आले आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राततील अनेकांनी यावर टीकेची झोड उठवल्यानंतर आता खा.लंके यांनी झालेली भेट ही अपघाताने झाली असल्याचे सांगत मला ती “सन्माननीय” व्यक्ती कोण आहे हे माहीत नव्हते. नंतर त्या व्यक्तीची पार्श्वभूमी मला समजली असे सांगत सारवासारव केली आहे. झालेली भेट ही एक्सिडेंटली चुकीची झाली अशी कबुली आता खा.निलेश लंके यांनी खाजगी वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना दिली आहे.
खा.लंके म्हणाले की, समाजामध्ये काम करत असताना अनेकदा लोकं थांबवतात. त्या पद्धतीने पुण्यात मला त्या मारणेंनी गाडीला हाथ करून थांबवले. चहा घेण्याची विनंती केली. त्यामुळे मी गेलो. तिथे माझा सत्कार करण्यात आला. आज मला त्या व्यक्तीची पार्श्वभूमीवर समजली की आपण भेटलेली व्यक्ती कशी आहे ते. मात्र झालेली भेट ही एक्सिडेंटली होती. मला या व्यक्ती बद्दल माहिती असती तर मी गेलोच नसतो. ही माझ्या कडून एक्सिडेंटली चूक झाली, असे खा.लंके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.
निलेश लंके यांचा गुंड चेहरा पुढे आला -राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील:
–राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी खा.निलेश लंके यांच्या कुख्यात गुंड गजा मारणे याच्या भेटी आणि सत्काराबद्दल तिखट शब्दात टीका केली आहे. कोरोना काळात रुग्णांची सेवा करून समाजात उभी केलेल्या कामांमुळे त्यांचे नाव झाले. मात्र आता एका कुख्यात गुंडाच्या भेटीने लंके यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. निलेश लंके यांची पारनेर तालुक्यात आणि सुपा एमआयडीसी मध्ये दहशत आणि गुंडगिरी असल्याच्या आरोपांचा दाखला उमेश पाटील यांनी दिला आहे.