नगर:
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे एव्हाना महाराष्ट्राला परिचित झालेले नाव.. ते आमदार झाल्यानंतर त्यांनी केलेले कोविड मधील काम आणि सर्वसामान्य जनतेत राहून मागेल त्याला पुढे होणारा मदतीचा हात, 24 तास कधीही फोन करावा आणि नेत्यांनी फोन उचलून आपुलकीने चौकशी करावी आणि अडचणीतून कसा मार्ग काढता येईल या पद्धतीने समोरच्याला दिलासा द्यावा, अशा एकूणच धडाकेबाज कामकाजाच्या चौकटीत असलेले निलेश लंके सध्या नेहमीप्रमाणे आजही चर्चेत होते.
नुकतेच त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षा कडून लढताना महायुतीचे भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करत सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा सुजय विखे यांचा मनसुबा उधळवून लावला. अर्थातच निलेश लंके यांच्या या विजयाने पुन्हा एकदा त्यांचा वारू भरून वाहताना दिसून येत आहे.
पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक असलेले शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख असा शिवसेनेत प्रवास केलेले निलेश लंके यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला आहे. याच आशीर्वादातून पुढील वाटचाल लंके यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत केली असली तरीही त्यांचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीशी आजही घट्ट नाते आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो वा जुना कोणताही त्यांचा शिवसेनेचा सहकारी असो या सर्वांबद्दल नेहमीच स्नेह मैत्रीचे संबंध निलेश लंके यांनी जपलेले आहेत.
त्याचाच प्रत्येय आज शनिवारी आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून खासदार झालेले निलेश लंके यांनी आपला शिवसैनिकी बाणा दाखवत आपल्या सहकाऱ्यांसह मातोश्री गाठले. यावेळी केवळ त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे सहकारीच नव्हे तर शिवसेनेचे नगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या स्नेह भेट सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले दिसून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सर्वांचे स्वागत आनंदाने करत सर्वांसोबत बराच वेळ गप्पा गोष्टी करत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे अनुभव सर्वांकडून ऐकून घेतले. यावेळी निलेश लंके यांनी शिवसेनेत असताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. मातोश्री मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले. यावर आपण जुन्या आठवणीने अगदी गदगदित झालो अशी भावना लंके यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेनेच मला घडवले, एक कार्यकर्ता ते नेता आणि आमदार ते खासदार हा सर्व प्रवास यशस्वी झाला कारण त्याचा पाया शिवसेनेमध्ये पक्का घडलेला होता. आजही मी एक कार्यकर्ता म्हणून जनसेवेत 24 तास राहत असतो. हे बाळकडू मला शिवसेनेकडून मिळाले असल्याची भावना निलेश लंके यांनी व्यक्त केली. आजच्या भेटीत उद्धव साहेबांनी आपुलकीने चौकशी करत मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभेला समोर जाणार आहे. यामुळे आपणही उद्धव साहेब यांना नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील आणि येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून दिसतील यासाठी आपण पूर्ण ताकत लावू अशी ग्वाही दिली असल्याची माहिती लंके यांनी दिली.
एकूणच आजचा निलेश लंके यांचा मातोश्री दौरा हा एक उत्साह पूर्ण असतानाच माध्यमातून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. कारण निलेश लंके हे नाव आता जादुई झाल्याचं दिसून येत असून लोकसभेत शपथ घेण्यासाठी जाण्यापूर्वी त्यांनी आवर्जून मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामुळेच आता निलेश लंके संसदेच्या कामकाजात आपला जलवा कसा दाखवतात याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.
नवा महाराष्ट्र घडवणारे दोनच साहेब..
-नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदारकीची शपथ घेण्यासाठी उद्या दिल्लीला रवाना होत आहे. तत्पूर्वी मातोश्रीवर जाऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.याखेरीज आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांना वंदन केले.मी लहान असताना साहेबांनी मला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. त्या प्रसंगाची अतिशय उत्कट व भावनिक आठवण यानिमित्ताने झाली. नवा महाराष्ट्र घडविणारे दोन साहेब अर्थात बाळासाहेब आणि आदरणीय पवारसाहेब अशा महान व्यक्तीमत्वांचे मला सतत आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले. उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय आपुलकीने विचारपूस करुन विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व आमदार येणाऱ्या विधानसभेला निवडून आणणार असा शब्द उद्धवजींना दिला. हि अतिशय आनंददायी भेट होती. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या लोकसेवेच्या शिकवणी पासून किंचितही ढळू नये यासाठीची असीम ऊर्जा या भेटीतून मिळाली.
-खा.निलेश लंके