नगर:
नवनिर्वाचित खा.निलेश लंके यांनी शनिवारी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खा.लंके यांच्या सहकाऱ्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी होते. युवा राज्य सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, संदेश कार्ले, भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव आदींचा त्यात समावेश होता.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत फोटो काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांची एकच झुंबड उडाली होती. गर्दी एव्हढी होती आणि उद्धव साहेबांसोबत फोटो काढण्याची संधी अनायासे आल्याने सर्वांचीच फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरू होती. उद्धव ठाकरेंपण जमेल तसे सर्वांसोबत फोटो काढत स्मितहास्य करत उभे होते. मात्र गोंधळ जरा काहीसा वाढलेलाच होता.
अशात माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे उद्धव ठाकरे आणि फोटोग्राफरच्या मध्ये गर्दीच्या रेट्यात आले. उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीच्या बाळासाहेब बोराटें मुळे फोटोग्राफरला फोटो काढता येईना, तर ठाकरेंना समोर फोटोग्राफर दिसेना. फोटो काढणाऱ्यां फोटो निघावा म्हणून धडपड जोर्यात सुरू होती. बाळासाहेब बाजूला व्हा, असे काहीजण सांगत होते. पण गोंधळामुळे ते जागेवरच उभे होते. त्यांनाही एखाद्या छान पोज मध्ये फोटो काढायचा होताच.
बोराटे मध्ये उभे असल्याने फोटो घेण्यात अडथळा येत असल्याचे पाहून मग उद्धव ठाकरेंनीच त्यांना बाजूला होण्याचे सांगितले, तसेच, “या ठिकाणी मी आहे म्हणून ठीक.. मोदी असते तर माहीत आहे ना!! माझ्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये तू कसा आला म्हणून काय झालं असतं..” असे म्हणत मिश्किल टिप्पणी केली. यावेळी एकच हशा पिकला.
बोराटेंनी पण, साहेब, मोदी असते तर आम्ही फोटो काढायला गेलोच नसतो, असे हसत उत्तर दिले. कमी जागेत गर्दी होत असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरेंनी कुठली काकू न करता सर्वांना आपल्यासोबत फोटो काढणाची संधी दिली. यावेळी खा.निलेश लंके कुठेतरी उत्साही कार्यकर्त्यांच्या गर्दीत हरवून गेले होते. मात्र त्यांनी हे फोटोसेशन व्यवस्थित पार पडावे आणि सर्वांना उद्धव साहेबांसोबत फोटो काढता यावा ते प्रयत्नात दिसले.