नगर:
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज संसदेमध्ये आपल्या खासदार पदाची शपथ लोकसभा सभापती यांच्याकडून घेतली. यावेळी शपथ घेतल्यानंतर त्यांनी सभापतींशी हस्ता ंदोलन केलं. त्यानंतर संसदेच्या रजिस्टरमध्ये खासदारांच्या यादीमध्ये नोंद म्हणून सही करण्यास ते कदाचित काही काळ विसरले.. शपथ घेतल्यानंतर सभापतींना नतमस्तक होत हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर ते थेट आसनस्थ होण्यास निघाल्याचे दिसून आले. मात्र लगेच कदाचित त्यांना कोणीतरी लगेच संसद सदस्य वहीमध्ये सही करण्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतर निलेश लंके मागे वळून त्यांनी सही केली. यावेळी काही थोडा वेळ संसद सदस्यातून हास्य कल्लोळ झाला.
निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील दुष्काळी नगर जिल्ह्यातील पारनेर सारख्या छोट्या गावातून पुढे आलेले नेतृत्व आहे. एक शिक्षकाचा मुलगा त्यांच्या हंगा गावातील ग्रामपंचायत सदस्य ते आज संसदेत खासदार असा मोठा पल्ला गाठला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यंदाच्या निवडणुकीत राज्यात मोठा दबदबा असलेले विखे कुटुंबातील डॉक्टर सुजय विखे हे विद्यमान खासदार असताना त्यांचा धक्कादायक असा पराभव केलेला आहे.
2019 ला सुद्धा निलेश लंके यांनी त्यावेळेसचे तीन वेळेस सलग शिवसेना आमदार असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले विजय औटी यांचा विक्रमी मताधिक्याने धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर कोविड काळात केलेले त्यांचे काम देश पातळीवर नावाजलेले आहे. एकूणच ग्रामपंचायत सदस्य ते संसदेतील खासदार असा त्यांचा प्रवास हा आश्चर्यकारक आणि कुतूहलाचा विषय झालेला आहे. त्यामुळेच खासदार झालेल्या निलेश लंके यांच्या प्रत्येक वक्तव्य, हालचाली, गाठीभेटी यावर माध्यमांचा आता फोकस दिसून येतोय, नुकतेच त्यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची घेतलेली भेटही अशीच चर्चेत आली होती. प्रचाराच्या काळात पारनेर एमआयडीसी मधील दहशत, गुंडगिरी, खंडणी असे आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून करत त्यांच्यावर निशाणा साधला गेला. त्यानंतरही ते अटीतटीच्या लढतीत निवडून आले.
प्रचारात त्यांच्यावर इंग्रजी येत नसल्याचा आणि अल्पशिक्षित असल्याचा आरोप झाला. त्यानंतर आज खासदार झालेले निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेत विरोधकांना प्रत्युत्तर देत धक्का दिला आहे. कार्यकर्त्यात आज शपथ घेतल्यानंतर मोठा उत्साह असून पारनेर तालुक्यात विशेष करून जल्लोष साजरा होत आहे. तत्पूर्वी झालेल्या शपथविधीत संसद सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर लंके संसदेच्या वहीमध्ये सही करण्यास काहीसे विसरले काय आणि यामुळेच त्यांचा तो व्हिडिओ सध्या चर्चेत आलेला दिसून येत आहे. दिलवाले दुनिया ले जायेंगे या गाजलेल्या सिनेमातील एक डायलॉग आहे, बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा.. कदाचित लंके उद्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना एक शिक्षकाचा मुलगा सर्व सामान्य कार्यकर्ता संसदेत गेल्यानंतर शपथ घेते वेळी थोडीशी गडबड झाली असेल तर अशीच काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून अपेक्षित दिसून येईल..