आ.प्राजक्त तनपुरें समोर आता युवा आव्हान!!
शिवाजी कर्डीले राहुरी की श्रीगोंदा??
नगर:
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांवर चर्चा सुरू झाली असून लोकसभेला कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला आघाडी किंवा पिछाधीला सामोरे जावे लागले यावर आता विधानसभा मतदारसंघात दावेदार आणि इच्छुक उमेदवारांची “फिल्डिंग” सुरू झाली आहे. या अनुषंगाने नगर दक्षिणेत राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप कडून इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
शिवाजी कर्डीले असणार दावेदार..
मतदारसंघ पुनर्रचनेत 2008ला नगर तालुका मतदारसंघ संपुष्टात आला. नगर तालुक्यातील अनेक गावांचा समावेश हा राहुरी मतदातसंघात झाल्याने माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी आपला मोर्चा राहुरी मतदातसंघात वळवला आणि सलग दोनदा विजय मिळवला. त्यांच्या राहुरीतील उमेदवारी साठी भाजप जेष्ठनेते चंद्रशेखर कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र गेल्यावेळी 2019 ला कर्डीले यांना पराभव पत्करावा लागला. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले आणि महाविकास आघाडी सरकार मध्ये राज्यमंत्री झाले. असे असले तरी कर्डीले यांचे मोठे वर्चस्व राहुरी मतदारसंघात आहे.
दरम्यान 2019 ते 2024 पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या साडेचार वर्षात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, त्यात आता लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या निकालानंतर नवी राजकीय समीकरणे समोर येताना दिसत आहेत.
यंदा “तनपुरे-कर्डीले” कि “तनपुरे-कदम”!!
राहुरी मतदातसंघात गेले तीन टर्म तनपुरे विरुद्ध कर्डीले असाच मुख्य सामना दिसला आहे. मात्र राजकीय उलथापालथी मध्ये यावेळी राहुरी मधून भाजप कडून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे मैदानात उतरण्यास आग्रही असल्याचे बोलले जात आहे. 2019 विधानसभेला ते इच्छुक होते. मात्र कर्डीले यांनाच उमेदवारी मिळाली. कर्डीले यांचा त्यावेळी झालेला पराभव आणि सध्याची बदललेली राजकीय गणिते पाहता सत्यजित कदम 2024 विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परस्थितीत यंदा विधानसभा लढवण्यासाठी कदम कुटुंब सक्रिय झाल्याचे बोलले जात असून सत्यजित कदम यांनी मुंबईत भाजप वरिष्ठांच्या भेटी घेतल्या असल्याचे समजते आहे. या बाबत कदम यांच्याकडून अद्याप कोणतीही भेटीची पृष्ठी अथवा प्रतिक्रिया आलेली नसली तरी राहुरीतून महायुतीत भाजप पक्षाकडून उमेदवारी साठी ते सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
कदम कुटुंब आणि अजित पवार कनेक्शन..
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवळाली प्रवरा आजोळ आहे. चंद्रशेखर कदम हे त्यांचे मामे भाऊ असून सत्यजित कदम हे मामेभाऊ पुत्र आहेत. अजित पवार महायुती मध्ये असल्याने ते आपले वजन सत्यजित कदम यांच्यासाठी फडणवीस यांच्या कडे लावतील, कारण या निमित्ताने राजकीय परिस्थितीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असलेले विद्यमान आ.प्राजक्त तनपुरे यांच्या समोर आव्हान उभे करत शरद पवार गटाला शह देण्याचा प्रयत्न करतील असे दिसून येत आहे. सत्यजित कदम यांना आ.तनपुरे यांच्या समोर उमेदवारी मिळाल्यास बारामती लोकसभा निवडणुकी प्रमाणे मोठी रंगत राहुरी मतदारसंघात असेल आणि ही लढत राज्यात निश्चितच लक्षवेधी असेल यात शंका नाही.
किंगमेकर शिवाजी कर्डीले कुठून उमेदवारी करणार??
2019 ला शिवाजी कर्डीले यांचा प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला असला तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.सुजय विखे यांना राहुरी मतदातसंघात 11 हजार 936 इतकी आघाडी मिळाली आहे. या आघाडीत कर्डीले यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. कर्डीले एक मुरलेले राजकारणी असून राजकीय नातेसंबंध आणि विविध पक्षातील नेत्यांशी त्यांचे असलेले मैत्रीचे संबंध पाहता अनेक निवडणुकांत ते किंगमेकर ठरतात. काही दिवसांपासुन कर्डीले राहुरीतून विधानसभा लढवणार की श्रीगोंदयातून यावर सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कर्डीले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले असले तरी कर्डीले यांनी अशा चर्चात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष या नात्याने बँके संदर्भात या भेटी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र कर्डीले-अजित पवार भेट यावरून श्रीगोंदयाबाबतची चर्चा असतानाच आता सत्यजित कदम सक्रिय होत राज्यातील भाजप वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा असताना हा “योगायोग” विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे संकेत देणारा असल्याचे बोलले जात आहे. आता यावर संघ आणि भाजप एकनिष्ठ असलेल्या कदम कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया येत हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.