अहिल्यानगर मतदार संघातील नागरिकांच्या माहितीसाठी!
नगर:
खा.निलेश लंके यांनी जिल्ह्यातील पोलीस खात्यातील एकूणच कारभारा विरुद्ध जोरदार मोहीम उघडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा गुन्हे शाखेतील आर्थिक गैरकरभराबद्दल त्यांनी नुकतीच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधीपक्ष नेत्यांना लेखी पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केलेली आहे. खा.लंके यांनी केलेल्या तक्रारी नंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी खा.लंके यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल असे सांगितल्याचे वृत्तपत्रातून आले आहे. मात्र सरकार स्तरावर अद्याप खा.लंके यांच्या तक्रारीची आणि मागणीची दखल घेतल्याचे अद्याप पुढे आलेले नाही.
अशात आता खा.लंके यांनी सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात येणाऱ्या विविध अडचणी आणि अनुभव पाहता स्वतःच लक्ष घालण्याचे ठरवलेले दिसत आहे. तक्रार घेऊन गेल्या नंतर मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ आणि दाखल तक्रारीच्या अनुषंगाने “तपास चालू आहे” असे मिळणारे उत्तर.. सोबतच “चिरीमिरी”ची अपेक्षा आणि मागणी अशा चीड आणि संताप येणाऱ्या अनुभवावर उपाय म्हणून या प्रकारचे अनुभव सर्वसामान्य नागरिकास आल्यास त्यांनी थेट आपल्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या साठी खा.लंके यांच्या कार्यालयातील एक मोबाईल संपर्क नंबर त्यांनी जाहीर केला असून पोलीस ठाण्यासबंधीत असलेली तक्रार ऑफिस व्हाट्स अप नंबर- “96379 43333” यावर कळवण्याचे सांगितले आहे. तसेच तक्रारदार व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही आश्वासित केले आहे.
या बाबत खा.लंके यांच्या कार्यालयाच्या वतीने खालील निवेदन जारी करण्यात आलेले आहे.
“अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील व्यवसायिक नागरिक तसेच इतर सर्वसामान्य नागरिक आपणा सर्वाना कळविण्यात येते की, आपणास कोणाला पोलीस विभागातील अधिकारी यांच्या मार्फत चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात असेल किंवा येथून माघे दिला असेल तर आपण सर्वांनी लेखी स्वरूपात रीतसर तक्रार माझ्या संपर्क कार्यालयाच्या खाली दिलेल्या व्हाट्स अप नंबर वर पाठवावी आपल्या सर्वांचे नाव गुपित राहील यांची आपण नोंद घ्यावी!
(टीप:-ऑफिस व्हाट्स अप नंबर- 96379 43333)
*आपले नम्र :-मा. खासदार श्री. निलेश लंके जनसंपर्क कार्यालय अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ*”