नगर:
दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या ६१ व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार उद्या शुक्रवारी अकोले शहरात येत आहेत. यानिमित्ताने अकोले शहरातील बाजार तळावर एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन भांगरे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम आदरणीय दिवंगत नेते भांगरे यांना ६१ व्या जयंती सोहळ्या निमित्ताने आदरांजली वाहण्याचा असला आणि यामागे भांगरे कुटुंबासह एकूणच अकोले तालुक्यातील जनतेचा प्रेमाचा भावबंध असला तरी अवघ्या दोन-अडीच महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या असताना शरद पवार येत असल्याने अकोल्याचे राजकारण ढवळून निघणार आहेत.
पिचडांना लहामटेंनी लावला ब्रेक!!
-अकोले मतदातसंघ आणि पिचड कुटुंब असे गेले कित्येक वर्षांचे समीकरण २०१९ला किरण लहामटे यांनी बदलवले. प्राप्त परस्थितीत पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. शरद पवार यांची कित्येक वर्षे साथ देणारे आणि राज्याच्या विधिमंडळात निवडून जात मंत्रिमंडळात मंत्री असलेले जेष्ठनेते मधुकर पिचड यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय आश्चर्यकारक आणि पवारांसाठी धक्कादायक होता. २०१४ च्या मोदी लाटेत जेष्ठनेते मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड एकसंघ राष्ट्रवादी कडून निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे मधुकर तळपडे आणि भाजप कडून लढलेले अशोक भांगरे पराभूत झाले. मात्र २०१९ विधानसभे पूर्वी पिचड पितापुत्र भाजपवासी झाले. मात्र अकोल्याच्या जनतेला त्यांचा हा निर्णय काहीसा रुचला नाही आणि डॉ.किरण लहामटे हे तब्बल ५८ हजार मतांवर पुढे जात निवडून आले. लहामटे यांना मिळालेली मतांची आघाडी ही शरद पवार या नावाची जादू होती हे कोणीही नाकारू शकणार नाही.
२०१९ चा राजकीय ट्विस्ट अकोल्यात २०२४ कायम राहणार!!
-२०१९ विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक लागले. पवारांच्या राष्ट्रवादीने जादूमय कामगिरी केली आणि राज्यात साहेबांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेत नवे आणि ऐतिहासिक राजकीय समीकरण बनवत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणले. पुढे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांतर्गत राजकीय बंडानंतर राज्यात नवीन समीकरणे पुढे आली. या नव्या समीकरणात अनेक राजकीय नेत्यांच्या तात्कालिक भूमिका आणि निर्णय यामुळे जो तिढा निर्माण झालाय तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येत असताना नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे.
साहेबांचे संकेत आणि अकोल्याचे राजकारण ढवळणार..
-अकोले मतदातसंघ या नव्या समीकरणाला अजिबात अपवाद नसून त्यामुळेच दिवंगत अशोकराव भांगरे यांच्या ६१ व्या जयंती कार्यक्रमास साहेबांची उपस्थिती ही येणाऱ्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर जागा निश्चित करणारी असणार आहे.
स्व.भांगरे आणि पवार साहेबांचे घनिष्ट संबंध येणार कामी..
-दिवंगत अशोकराव भांगरे यांनी आपल्या राजकीय जीवनात विविध पक्षांकडून निवडणुका लढवल्या. पाच वेळी निकराचे प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाहीच. भांगरे परिवाराचे मोठे योगदान आदिवासी बहुल असलेल्या अकोले तालुक्याला आणि आदिवासी चळवळीला आहे. मात्र संयमी पण दिलखुलास बोलके व्यक्तिमत्त्व असलेले अशोकराव यांना आमदारकी पासून तालुक्याने वंचित ठेवले ही वस्तुस्थिती आहे. अशोकरावांनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. तरीही पराभव त्यांना आला. मात्र या दरम्यान त्यांची वैयक्तिक नाळ ही शरद पवार यांच्याशी कायम राहिली. त्यांच्या निधनाला वर्ष उलटले असताना त्यांचा ६१ वा जयंती सोहळा अकोले तालुका साजरा करताना या कार्यक्रमास खुद्द शरद पवार येत आहेत. अकोले मतदारसंघातील नागरिकांनी पवार साहेबांवर भरभरून नेहमीच प्रेम केले आणि साहेबांनी पण या तालुक्याला कधी काही कमी पडू दिले नाही.
तालुक्याच्या नजरा पवार साहेबांच्या भाषणाकडे!!
-मात्र २०१९ दरम्यान अनेक राजकीय घडामोडी अकोले तालुक्यात झाल्या. पिचड कुटुंब शरद पवार यांच्या पासून दूर गेले. निवडून आलेले आ.लहामटे यांनीही गेल्या वर्षी साहेबांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. या दरम्यान भांगरे कुटुंबाने शरद पवार यांच्या सोबत राहणे पसंत केले. आता शरद पवार विधानसभा निवडणुका समोर असताना तालुक्यात स्व.भांगरे यांच्या कार्यक्रमास येत असताना त्यांच्या भाषणाकडे अकोल्याच्या सर्व राजकारण्यांचे डोळे आणि कान असणार हे निश्चित. शरद पवार आपली भूमिका साधारण पणे अगदी स्पष्ट न बोलता संकेत देत असतात. त्यामुळे पवारांचा कल नेमका कुणाकडे असेल याची उत्सुकता भांगरे कुटुंबासह पिचड आणि लहामटे यांनाही असणार आहे. कारण साहेबांचा वरदहस्त ज्याच्या डोक्यावर असेल त्याची विधानसभेची “मत-लावनी” भरघोस असणार यात शंका नसणार आहे.