राहुरी(प्रतिनिधी): दोन-दोन वर्षे कामांना मंजुरी मिळून वर्क ऑर्डर निघत नाही. हे सरकार नावाला “गतिमान” असले तरी प्रत्येक्षात हे सरकार निष्क्रिय, स्थगितीबाज,घोटाळेबाज आणि वसुली सरकार असल्याचा घणाघात आ.प्राजक्त तनपुरे (MLA PRAJAKTA TANPURE) यांनी केला आहे. आज(मंगळवार) तालुक्यातील नगर मनमाड रस्ता मुळा डॅम फाटा ते मुळानगर या जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या विकासकामास होत असलेल्या विलंबाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आ.तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आ.तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कामांना स्थगिती आणि विलंब होत असल्याबद्दल चांगलेच संतापून सरकारवर तोंडसुख घेतले.
घड्याळ चिन्ह दिसले की..
मविआ सरकार असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कामास मंजुरी दिली होती. मात्र दीड-दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली असतानाही वर्क ऑर्डर निघत नसल्याबद्दल आ.तनपुरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. घड्याळ चिन्ह दिसले की कामच करायचे नाही हे धोरण सरकारचे असल्याचा आरोप त्यांनी केला. आता हे घड्याळ चिन्ह किती दिवस राहील माहीत नाही असे म्हणत आम्ही मात्र इथेच आहोत हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
आम्ही राष्ट्रवादीवाले आमदार काय परग्रहावरून आलोय का!!
राष्ट्रवादीच्या कामांना मंजुरी न देता स्थगिती द्यायची असेच दिसते, 30-30 कोटींच्या कामांना स्थगिती आली. न्यायालयात जावे लागले. शेवटी ही कामे गोरगरीब जनतेची आहेत. मात्र घड्याळ चिन्ह दिसले की कामेच करायची नाहीत असे सरकारचे धोरण असल्याचे आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले. आम्ही घड्याळ चिन्हवाले आमदार काही परग्रहावरून आलेलो नाही. टेंडर मध्ये “दक्षिणा” मिळाली नसल्याने वर्क ऑर्डर निघत नाही का? असा आरोपही आ.तनपुरे यांनी यावेळी केला.
दोन वर्षांपासून काम रखडल्याने आंदोलन..
तालुक्यातील नगर मनमाड रस्ता मुळा डॅम फाटा ते मुळानगर या जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या विकासकामास विलंबा होत आहे. नगर मनमाड रस्ता ते मुळा डॅम फाटा हा या भागातील वरवंडी, बाभुळगांव, मुळानगर या गावांच्या तसेच मुळानगर येथे येणा-या पर्यटकांच्या वाहतुकीच्या दृष्टिने एक महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. सध्या या रस्त्यावरील अपघातांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झालेली आहे.या रस्त्याच्या विकासाच्या कामासाठी महाविकास आघाडीचे सरकार असतांना दि.1 एप्रिल, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार 4 कोटी 74 लाख एवढया स्वखर्चाच्या कामास शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. परंतू नंतर या कामाच्या निविदा बोलाविण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रचंड विलंब होऊन अखेर दि.27 मार्च, 2023 रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली. विधानसभेत लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर अखेर 26 जुलैब2023 रोजी निविदा उघडण्यात येऊन अखेर सप्टेंबर, 2023 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. सुमारे चार महिन्यांचा कालावधी होऊनही संबंधीत ठेकेदार काम सुरू करण्यास दिरंगाई करीत आहे. विभागाच्या या अनास्थेमुळे आज आमदार प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे यांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.