अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा नागवडेंचा राजीनामा..
#अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे महाविकास आघाडीच्या वाटेवर..
#एक तर मविआ मधून अन्यथा अपक्ष, मात्र निवडणूक लढवणारच -नागवडे परिवाराचा पवित्रा
श्रीगोंदा:
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी रविवारी जाहीर केली असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघात उमेदवार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये राहुरीतून माजी आमदार शिवाजी कर्डिले, श्रीगोंदा मधून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते, शिर्डी मधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाथर्डी मधून विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कर्जत जामखेड मतदार संघात विधानपरिषद सदस्य माजी मंत्री राम शिंदे यांच्या नावाची घोषणा प्रदेश भाजपाकडून करण्यात आली आहे. मात्र यामुळे महायुतीमधून उमेदवारी अपेक्षित असलेले श्रीगोंदा मधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि त्यांचे पती तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या समर्थकांनी जनसंवाद मेळाव्याचा आयोजन करत लागलीच कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुराधा नागवडे या निवडणूक लढवणारच. यासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी नागवडे परिवाराची आहे. श्रीगोंदयाची जागा महाविकास आघाडीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांचीही उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. मात्र आता नागवडे यांनीही उमेदवारीची अपेक्षा जाहीर केली आहे. राजेंद्र नागवडे यांनी यासाठी शरद पवार यांच्याशी भेटी झालेल्या आहेत. महाविकास आघाडी कडूनही उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी नागवडे परिवाराने केल्याचे मेळाव्यातून दिसून आले. नागवडे परिवाराचे श्रीगोंदा तालुक्यात मोठे वर्चस्व असून यांच्या निमित्ताने परिवाराला मानणारा वर्ग तालुक्यात आहे. अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा एक प्रकारे निर्णय घेतला असून हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जाणार आहे. त्याचबरोबर आता महाविकास आघाडीतून नागवडे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये उमेदवारी कोणाच्या पदात पडते यासाठी मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तालुक्यातील वांगदरी या ठिकाणी नागवडे समर्थकांच्या मेळाव्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आता भाजपच्या प्रतिभा पाचपुते विरुद्ध अनुराधा नागवडे अशी लढत रंगतदार होईल असे एकूण सध्याचे चित्र आहे.