अहिल्यानगर:(राजेंद्र त्रिमुखे)
– भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीने महाराष्ट्र विधानसभेसाठी पक्षाच्या 99 उमेदवारांची पहिली यादी घोषित करत आघाडी घेतली आहे. रविवारी 99 उमेदवारांची घोषणा केली असून याग 15 महिला उमेदवारांना स्थान भारतीय जनता पक्षाने दिले आहे. भाजपने विधानसभेसाठी घोषित केलेल्या 99 जागांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये शेवगाव-पाथर्डीतून विद्यमान आमदार मोनिका राजळे, राहुरी मतदार संघातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा मतदार संघातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची स्वास्थ्य ठीक नसल्याने त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते, शिर्डी मतदारसंघातून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कर्जत-जामखेड मतदार संघात माजी मंत्री आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य प्राध्यापक राम शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ९९ उमेदवारांची घोषणा भारतीय जनता पक्षाने करत राज्यात त्याचबरोबर जिल्ह्यातही आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत या उमेदवारांसमोर महाविकास आघाडी किंवा इतर पक्षाचे तसेच अपक्ष यांचे कसे आव्हान असणार याची मोठी उत्सुकता आता जिल्ह्याला लागून आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील बहुतांशी लढती कशा होतील याचा अंदाजही नागरिकांना आलेला आहे.
शिर्डीत पुन्हा एकदा विखेंना विजया साठी संघर्ष करावा लागणार!!
-शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. विखे पाटील हे राज्यातील दिग्गज नेते असून अनेकदा मुख्यमंत्री पदासाठी त्यांची चर्चा होताना दिसून येते. मात्र गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर विखे पाटील यांच्यासमोर विरोधकांनी एकत्रित येत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या आव्हानाला दरवेळी जोरदारपणे प्रत्युत्तर देत विखे पाटील नेहमीच विजयी होत आलेले आहेत. यंदाही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर संभाव्य नावामध्ये आपल्या शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या प्रभाताई घोगरे त्याचबरोबर राजेंद्र पिपाडा आणि विवेक कोल्हे असे काही नावे चर्चेत आहेत. यात कोल्हे कुटुंब भारतीय जनता पक्षावर विखेंमुळे नाराज असल्याचं गेल्या काही महिन्यात दिसून आलेले आहे. लोकसभेतही याचे पडसाद दिसून आले. त्याचबरोबर गणेश साखर कारखान्याच्या निमित्ताने बाळासाहेब थोरात,विवेक कोल्हे,खा.लंके आणि घोगरे हे सर्व एकत्र येत गणेश कारखान्यावर सत्ता मिळवत विखेंना एक प्रकारे मोठा धक्का दिला होता. आता यापैकी कोण विखेंच्या समोर उमेदवार असेल यावर सध्या मोठी उत्सुकता आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही चर्चा सकारात्मक चर्चा झाल्याचं समजत आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांचे संभाव्य बंड शमले का याबद्दलही उत्सुकता आहे, मात्र असे झाल्यास प्रभावती घोगरे या राधाकृष्ण विखे यांच्यासमोर आव्हान उभे करतील.
मोनिका राजळेंच्या विजयी हॅट्रिक मध्ये अनेकांची बाधा!!
-शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून सलग दोन वेळेस २०१४ आणि २०१९ ला सलग दोन वेळेस निवडून आलेल्या मोनिका राजळे यांना पुन्हा तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने संधी दिली आहे. त्यांच्यासमोर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रताप ढाकणे यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. ढाकणे यांना अनेकदा विजयश्री ने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे त्यांनी यंदा जोरदार तयारी दोन-तीन वर्षांपासून केलेली असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. ढाकणे यांनी लोकसभेला निलेश लंके यांच्यासाठी जीवाचे रान करत प्रचार केला असल्याने खा. लंकेची रसद त्यांना निश्चितपणे मिळेल. त्याचबरोबर मतदार संघातील चंद्रशेखर घुले यांच्या भूमिकेलाही सध्या महत्त्व असून महाविकास आघाडी कडून उमेदवारीसाठी त्यांचाही विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. त्याचबरोबर मतदार संघातील काकदे कुटुंबातील हर्षदा काकडे त्याचबरोबर पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नाराज पदाधिकारी गोकुळ दौंड हेही उमेदवारीसाठी इच्छुक असून पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे त्याचबरोबर हर्षदा काकडे, वंचितचे प्रा.चव्हाण, अपक्ष गोकुळ दौंड असे मोठे आव्हान असून मतदारसंघात वंजारी समाजाचा प्राबल्य असल्याने गोकुळ दौंड यांच्या अपक्ष उमेदवारीला मोठे महत्त्व आल्याची चर्चा आहे.
रोहित पवार-राम शिंदे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागणार..
-राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये २०१९ प्रमाणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांच्यात पुन्हा एकदा सामना होणार हे निश्चित आहे. राम शिंदे हे २०१९ ला रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले. मात्र दरम्यानच्या काळात त्यांना पक्षाने विधान परिषदेवर घेत त्यांचा मतदार संघात दबदबा कायम ठेवला। त्याचबरोबर आता नुकतेच रोहित पवार यांची साथ सोडून राम शिंदे यांच्या सोबत आलेले ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांच्यामुळे राम शिंदे यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जात असून रोहित पवारांचे अनेक कार्यकर्ते शिंदे यांच्यासोबत दरम्यानच्या काळात आलेले आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेड मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात घासून निवडणूक होणार असून कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यामध्ये असणार आहे. नुकतेच शरद पवार यांनी मतदारसंघात बोलताना रोहित पवार यांनी पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिले आता पुढील पाच वर्ष ते महाराष्ट्रात लक्ष देतील असे म्हणत रोहित पवार यांच्याकडे राज्य पातळीवर पक्षाची अथवा मविआ सरकार आल्यास मंत्री पदाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. या अनुषंगाने कर्जत जामखेड मधील होणारी पवार-शिंदे लढत ही राज्यातील लक्षवेधी ठरणार आहे.
श्रीगोंदयात पाचपुतें पुढे अनुराधा नागवडे यांचे तगडे आव्हान असणार!!
श्रीगोंदा मतदार संघातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना तब्येतीच्या कारणास्तव उमेदवारी न देता त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र बबनराव पाचपुते यांनी पत्नी ऐवजी आपला मुलगा विक्रम पाचपुते यांना उमेदवारी द्यावी यासाठी थेट मुंबई गाठत देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी बदलली जाऊन विक्रम पाचपुते हे भाजपाचे उमेदवार असणार का हे लवकरच समजणार आहे. मात्र प्रतिभा पाचपुते यांचे उमेदवारी कायम राहिल्यास त्यांच्यासम नागवडे कुटुंबाचे आव्हान हे मोठे असणार आहे रविवारी नागवडे कुटुंबाच्या वतीने घेतलेल्या मेळाव्यात नागवडे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी राजेंद्र नागवडे यांनी आम्हाला महायुतीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अपेक्षित होती मात्र मोठे प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने आम्ही आता महाविकास आघाडी कडून मिळेल त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारच असे घोषित केले आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडूनही उमेदवारी न दिले गेल्यास अनुराधा नागवडे या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असतील असेही राजेंद्र नागवडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते नागवडे यांच्या व्यतिरिक्त अजून इतरही इच्छुक उमेदवार असून त्यापैकी कोण कोण मैदानात उतरणार हे येत्या काही थोड्या दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र होणारी लढत ही पाचपुते विरुद्ध नागवडे तसेच महाविकास आघाडीतून राहून जगताप आणि ठाकरे शिवसेनेचे साजन पाचपुते अशा इच्छुकांमधून होणार असल्याने यामध्ये अंतिम लढत ही कोणा कोणात होणार याचीही उत्सुकता जिल्ह्याला लागून आहे.
राहुरीतून पुन्हा एकदा तनपुरे-कर्डीलें मधील लढत रंगतदार होणार!!
-राहुरी मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यासमोर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आव्हान आहे. शिवाजी कर्डिले म्हणजे विजयाचे समीकरण, 2019 ला प्राजक्ता तनपुरे यांनी रोखले. मात्र पुन्हा एकदा आता शिवाजी कर्डिले हे प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात सातत्याने जनतेशी संपर्क ठेवलेला आहे त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदार नेत्यांवर संबंध असल्याने त्यांची उमेदवारी ही महत्त्वाची असून आ.तनपुरे यांच्यासमोर महत्त्वाची मानली जाते, मात्र शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी घोषित केल्याने भारतीय जनता पक्षाचे आणि संघाशी एकनिष्ठ असलेले माजी आ.चंद्रशेखर कदम नाराज झाले असून त्यांचे पुत्र सत्यजित कदम यांनी माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या संमतीने लवकरच निर्णय घेतला जाईल असे म्हणत बंडखोरी चे संकेत सत्यजित कदम यांनी दिले आहे, असे झाल्यास राहुरी मतदार संघात तिरंगी लढत होऊन त्याचा फटका कर्डिले यांना बसू शकतो असे बोलले जाते. मात्र भारतीय जनता पक्ष सोबत नेहमीच असलेले चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पुत्र सत्यजित कदम यांची मनधरणी पक्ष नेतृत्वाकडून केली जाईल आणि त्यांचं बंड शमवले जाईल असं बोललं जात आहे.