नगर:
विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक मतदातसंघात अटीतटीच्या लढती आहेत, साहजिकच असे मतदातसंघ लक्षवेधी ठरणार हे ओघानेच आले. मात्र संगमनेर तालुका आणि विधानसभा मतदारसंघ हा गेली अनेक दशके काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला म्हणून राज्याला परिचित आहे. निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा बाळासाहेबांच्या विधानसभेची, विरोधकांची किल्लत आणि एकतर्फी निकाल ही परंपरा असण्यामागे थोरातांचे तालुक्यावर असलेले एकहाती वर्चस्व!! आणि म्हणून इथली निवडणूक कधीही राज्यासाठी लक्षवेधी नसते!! इतिहास पाहिला तर बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढण्यास कुणाचीही तयारी नसते. विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते हे नावापुरते पदाधिकारी. त्यामुळे थोरतांच्या विरोधात उमेदवारीला लोणीकरांचे बूस्टर डोस आवश्यक असते. अर्थात राज्याला थोरात-विखे राजकीय संघर्ष परिचित आहे. यात थोरातांनी संगमनेरचा तर विखेंनी राहत्याचा गड आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. थोरातांचा गड एकप्रकारे चिरेबंदी आहे, मात्र राहत्याचा गड शाबूत ठेवण्यासाठी विखेंना संघर्ष करावा लागतो हे अनेक निवडणुकातून दिसून आले आहे. खर्डे, पिपाडा,घोगरे आदी विखे विरोधकांनी नाही म्हंटले तरी विखेंना निवडणुकीच्या निमी थोडाफार का होईना घाम फोडला आहे. थोरातांचे मात्र अद्याप तरी असे नाही. त्यांच्या नावातील विजया प्रमाणे त्यांचा विजय निश्चित मानला जातो, थोरात लीड किती घेणार एव्हढी ती काय उत्सुकता शिल्लक असते. आणि म्हणूनच अवसान गळालेल्या विरोधकांना लोणीच्या टॉनिकची गरज असते आणि हे टॉनिक देण्यासाठी लोणीकरही अतुरलेले असतात ते केवळ थोरातांना राजकीय विरोधा मुळे. थोरातही विखेंच्या राजकीय विरोधासाठी राहत्यात लक्ष घालतात. ही राजकीय संघर्षाची परंपरा स्व.बाळासाहेब विखे विरुद्ध स्व.भाऊसाहेब थोरात यांच्यापासून सुरू झालेली आहे. हा संघर्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातही सुरू राहिला, मात्र या संघर्षात एक सुसंकृतपणा होता. एकमेकाला परास्त करण्याची संधी कुणीही आणि कधीही सोडली नाही. जिल्हा बँक असो वा जिल्हा परिषद, इथेही हा संघर्ष अनेकदा दिसून आला, अक्षरशः हे दोन्ही दिग्गज नेते एकाच राजकीय पक्षात असताही दिसला. मात्र 2019 ला विखे परिवार भाजपात दाखल झाला आणि या निमित्ताने थोरात-विखे राजकीय संघर्ष तिसऱ्या पिढीकडे सरकला. दरम्यान गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखेंच्या ताब्यात आठ-दहा वर्षे असलेला कारखाना कोल्हेन्नी आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले ते थोरातांची सक्रिय रसद आणि प्रभावती घोगरेंच्या गाजलेल्या भाषणामुळे. गणेशच्या पट्यात कोल्हेंचे वर्चस्व आहेच, ते यानिमित्ताने अधोरेखित झाले. मात्र थोरात-घोगरे यांनी दिलेल्या फोडणीने गणेशच्या पराभवाचा ठसका विखेंना जरा जास्तच बसला हे उघड आहे. आणि कुठेतरी याची परतफेड सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी खा.सुजय विखे यांनी संगमनेरता यंदा घातलेल्या गांभीर्यपूर्वक दखलअंदाजीने दिसून येत आहे. सुजय विखे लोणीची फौज घेऊन संगमनेरात दाखल झाले आहेत. त्यांच्या संगमनेर तालुक्यात आता पर्यंत चार तगड्या सभा झाल्या असून मोठी गर्दीजमवत धारदार आणि आव्हानात्मक भाषणांनी गाजत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून थोरतांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरातही मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरल्याचे दिसत असून “बाप” या एका शब्दावर संगमनेरचे राजकारण वेगळ्या आणि चिंताजनक वळणावर येऊन ठेपले आहे. याची सुरुवात सुजय विखेंच्या एका भाषणात आव्हानात्मक भाषेने झाली. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, पण माझ्या एकाही कार्यकर्त्याला काही झाले तर तुम्हांला इथे येऊन गाडून टाकू, अशा आशयाचे आव्हान सुजय विखेंनी दिले आणि ते जयश्री थोरातांना जिव्हारी लागले. आपल्या बापाला गाडून टाकण्याची भाषा वापरल्या बद्दल जयश्री थोरातांनी पुढच्याच सभेत खरपूस समाचार घेतला. माझ्या बापाबद्दल काहीही बोललेले खपवून घेणार नाही, आम्ही तुम्हांला परतीचा मार्ग दाखवू, संगमनेरची जनता तुम्हांला परतीचा मार्ग दाखवेल अशा करारी बाण्याने त्यांनी उत्तर दिले. या पुढे जात बाळासाहेब थोरात यांनीही सुजय विखेंच्या भाषेवर टीका करताना, लोकसभेला दक्षिणेत ते पडले मात्र आता ते “डोक्यावर पडले” असावेत म्हणून अशी असंस्कृत भाषा वापरत असल्याची बोचरी टीका केली. दरम्यान माझा बाप केवळ माझाच नाही तर या मतदारसंघातील सात लाख जनतेचा बाप आहे असे वक्तव्य जयश्री थोरातांनी केले होते. सुजय विखे यांनी दरम्यान आपण केलेल्या वक्तव्याचा खुलासा करत समोपचाराची भाषा केली होती. मात्र शुक्रवारी धांदरफळ इथे सुजय विखे यांनी थोरतांच्या विरोधात घेतलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले जेष्ठनेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांनी वापरलेल्या “बाप” या शब्दावर केलेले भाष्य निश्चितच अश्लाघ्य असेच होते. एका नातीच्या वयाच्या मुलीबाबत त्यांनी केलेले जाहीर भाष्य कुठल्याही अर्थाने समर्थनीय नसून राजकारणात भाषा किती खालच्या पातळीवर घेऊन जायचीय असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. राजकीय विरोध समजू शकतो पण तो व्यक्त होताना भाषा संयमित नसेल तर प्रक्षोभ उफाळून येतो याचा प्रत्येय सध्या संगमनेरात येत आहे. राजकारणात बहुतांशी नेते माझा तालुका किंवा माझा मतदातसंघ माझे कुटुंब आहे, या अर्थाने बोलत असतो तेंव्हा एक नेता म्हणून मी माझ्या जनतेची काळजी घेतो असाच त्याचा अर्थ सहजपणे कोणीही काढतो. मात्र वयाने जेष्ठ असलेले वसंतराव देशमुखांनी “बाप” या शब्दाचे केलेले “विवेचन” करताना कुणाच्या वैयक्तिक आयुष्याचा दाखला देण्याचा प्रयत्न करताना वापरलेली भाषा केवळ महिलांचा अपमान करणारीच नव्हे तर राजकीय संघर्ष किती वैर झाला असून जाहीरपणे बोलताना काही तारतम्य शिल्लक राहिलेले नाही हे सूचित करणारा आहे. वसंतराव देशमुखांच्या वाचाळ वक्तव्याने संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला असून कायदा-सुव्यवस्था बिघडण्यास सुरुवात झाली आहे. सुजय विखे व्यासपीठावर उपस्थित असताना सभेत वसंतराव देशुमुखांच्या असमर्थनिय वक्तव्यावर हसत टाळ्या वाजवणारे कुठले होते आणि त्यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झालेले जनता कुठली होती असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा खुद्द सुजय विखे यांनी माध्यमांसमोर निषेध करत त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची घोषणा लागलीच केली हे बरे झाले. असंस्कृत भाषा कोणीही वापरू नये, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असे सुजय विखेंनी सांगितले.त्याच बरोबर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या तोडफोड आणि जाळपोळ केल्याबद्दल कारवाईची मागणी विखेंनी केली आहे. व्हायरल व्हिडीओ मधून वसंतराव देशमुखांचे भाषण थांबविण्याचा सूचना सुरू होत्या हे दिसून येत असले तरी इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरण्यास कोणी प्रवृत्त तर केले नाही ना?? आणि भाषणाच्या ओघात इतक्या खालच्या पातळीवर बोलल्यानंतर स्थानिकांचा उद्रेक होण्याच्या आतच व्यासपीठावर त्यांना समज का देण्यात आली नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सभे नंतर अकोले आणि लोणी कडे जाणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या, कुठे जाळपोळही झाली, म्हणजे संगमनेरच्या सीमेवर घडवलेल्या घटनांत गाड्यांतुन बाहेरून गर्दी जमवण्याचा प्रयत्न होत आहे का असेही कोणी म्हणू शकते. वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचे पडसाद आता दिसून येत असून वातावरण तणावपूर्ण होत असताना ते निवळण्यासाठी आता सुजय विखे यांनी मोठ्या मनाने पुढाकार घेतला पाहिजे आणि थोरातांनी पण आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले पाहिजे हे गरजेचे आहे. दरम्यान संगमनेर पोलीस ठाण्यात वसंतराव देशुमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तोडफोड-जाळपोळ आदी प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.