विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे -बाळासाहेब पाटोळे
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासासाठी विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. शहरातील रस्त्याचे प्रश्न, युवकांना रोजगार, शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवायचे असतील तर त्यांच्या पाठीशी सर्वांना उभे राहण्याचे आवाहन भाजप अनुसूचित जाती-जमातीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटोळे यांनी केले.
प्रभाग क्रमांक 15 चौक रेल्वे स्टेशन परिसरात विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचार फेरीत पाटोळे यांनी आमदार जगताप यांना संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी श्याम साळवे, विनोद दुशिंग, अश्विनी पाटोळे, नाना पाटोळे, अशोक भोसले आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे पाटोळे म्हणाले की, शहरात राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी मागील दहा वर्षाचा अनुभव संग्राम जगताप यांच्याकडे आहे. भरीव निधी शहर विकासासाठी आणण्याचे कौशल्य जगताप यांच्याकडे आहे. शहरातील युवा नेतृत्व असलेले जगताप मताधिक्याने विजयाची हॅट्रिक करणार आहे. त्यांनी मंत्री व्हावे ही सर्व नगरकरांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.