अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे):
-विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून प्रचाराला आता अवघे काही मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत. या परिस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही मतदार संघामध्ये सर्व उमेदवार प्रचारासाठी सरसावलेले दिसून येत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात गाव भेटी दौऱ्यावर प्रत्येक उमेदवार जोर देत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करताना दिसून येत आहेत.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन राज्यात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. लोकसभेचे निकाल पाहता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्ता स्थापनेसाठीचा जादुई आकडा पार करेल असे बोलले जात आहे. दुसरीकडे महायुतीकडूनही राज्यात सरकार महायुतीचेच येईल असे देवेंद्र फडवणीस, एकनाथ शिंदे अजित पवार या नेत्यांनी सांगितले आहे.
23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होऊन 24 नोव्हेंबर रोजी कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याचीही मोठी उत्सुकता सध्या राज्यभर आहे. मात्र एकंदरीत महाविकास आघाडीचा लोकसभेतील परफॉर्मन्स पाहता महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकेल असे अनेक जाणकारांचे मत आहे. या परिस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल निवडून येणाऱ्या आमदारांत चार आमदारांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी असणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. याबाबतचे सुतोवाच महाविकास आघाडीतील पक्षाच्या मुख्य नेत्यांनीच विविध प्रचार सभांमधून केल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच कर्जत-जामखेड मध्ये भाषण करताना आमदार रोहित पवार यांना आता राज्यात काम करण्याची संधी असल्याचं सांगितलं होतं. आमदार रोहित पवार यांच्या प्रचार सभांमधून अनेक ठिकाणी त्यांचे समर्थक कार्यकर्ते भावी मुख्यमंत्री किंवा भावी नामदार, भावी मंत्री, भावी गृहमंत्री असे विविध बॅनर्स झळकावताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर रोहित पवार यांनीही एका भाषणात येणाऱ्या काही दिवसात कर्जत जामखेड चे महत्त्व राज्य पातळीवर राजकीय पटलावर दिसून येईल असे म्हटल्याने रोहित पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी फिक्स असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार यांनी राहुरी मतदार संघातील भाषणामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत त्यांना राज्यामध्ये काम करायचे आहे असे सांगत त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल याचे सूतोवाच केले आहे. संगमनेर मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बाबत केवळ मंत्रिपदच नव्हे तर थेट संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चेने जोर पकडलेला आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी ही सर्वश्रुत असणार आहे.
2019 ला अपक्ष निवडणूक लढवलेले नेवासे मतदारसंघाचे आमदार शंकराव गडाख आता अधिकृतपणे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. 2019 ला निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि त्यांची वर्णी ही शिवसेना कोट्यातून मंत्रीपदी लागली होती. त्यामुळे शंकरराव गडाख यांनाही महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यास मंत्री पदाची संधी असणार आहे.
त्यामुळे एकंदरीत चित्र पाहता राज्यात महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठीचे संख्याबळ प्राप्त झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातून येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री पदासह कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री असे विविध पदावर जवळपास चार जणांना संधी फिक्स असल्याची दिसून येत आहे.