अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे)
23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महायुतीने तगडे असे स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी राज्याचा मुख्यमंत्री कोण आणि नवीन मंत्रिमंडळात कुणकुणाची वर्णी लागणार हे 10 दिवस उलटल्यानंतर समोर आले नसले तरी आता मुख्यमंत्री पदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याचे समोर आले आहे. एव्हढेच नव्हे तर 5 डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा आझाद मैदानात शपथविधी पार पडणार असून त्यात महायुती मधील संभाव्य मंत्री कोणकोण असेल yachi स्पष्टता आता समोर येऊ लागली आहे.
या मंत्रिमंडळात अहिल्यानगर जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे पुढे येत आहे. यात भाजपचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
सलग आठव्यांदा निवडून आलेले जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी ही स्पष्ट असून ते कॅबिनेट मंत्री म्हणून असतील. सोबतच भाजपच्याच तिसऱ्यांदा निवडून आलेल्या शेवंगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांची तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आ.संग्राम जगताप यांची मंत्रिमंडळात वर्णी जवळपास अंतिम झाल्याचे सूत्रांकडून समजत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला जिल्हयात 4 जागी मोठे यश मिळाले आहे. यात आ.संग्राम जगताप सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले असल्याने त्यांची तसेच मोनिका राजळे याही सलग तिसऱ्यांदा निर्विवाद निवडून आलेल्या असल्याने त्यांची वर्णी अंतिम मानली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा स्वतंत्र लढताना 2 जागा मिळाल्या आहेत. संगमनेर मधून काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांचा अनपेक्षित पराभव करत एकनाथ शिंदे शिवसेनेचे अमोल खताळ निवडून आलेत. तर त्याच पद्धतीने नेवासे मधून दिग्गज मानले जाणारे शंकरराव गडाख यांचा पराभव शिंदे सेनेच्या विठ्ठलराव लंघे पराभव केला. हे दोन्ही निकाल प्रस्थापितांना धक्का देणारे आणि शिंदे शिवसेनेला नगर जिल्ह्यात उभारी देणारे आहेत. त्यामुळे यात थोरातांचा पराभव करणारे अमोल खताळ यांना एकनाथ शिंदे संधी देती अशी शक्यता आहे. मात्र हे दोन्ही आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव नाही. मात्र पक्ष वाढीसाठी यातील कुणाची निवड होऊन लॉटरी लागू शकते का याचीही उत्सुकता असणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जिल्हयात 12 पैकी 10 ठिकाणी विजयश्री प्राप्त केली आहे. यात भाजप 4, अजित पवार राष्ट्रवादी 4, एकनाथ शिंदे 2 याच बरोबर महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस 1 तर काँग्रेस पक्ष 1 असे आमदार निवडणून आलेले आहे.
*राष्ट्रवादी अजित पवार: 4 आमदार -नगर,अकोले,पारनेर,कोपरगाव
*भाजप: 4 आमदार
-शिर्डी,शेवंगाव-पाथर्डी, राहुरी,श्रीगोंदा
*शिंदे शिवसेना: 2 आमदार
-नेवासे,संगमनेर
*राष्ट्रवादी शरद पवार: 1 आमदार
-कर्जत-जामखेड
*काँग्रेस: 1 आमदार
-श्रीरामपूर