शिर्डी (प्रतिनिधी): बेंगलोर येथील दानशुर साईभक्त डॉ. राजाराम कोटा व परीवार यांनी 504.600 ग्रॅम वजनाचा 29 लाख 04 हजार 982 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला shree saibaba sansthan shirdi देणगी स्वरुपात दिला आहे.
बेंगलोर येथील दानशुर साईभक्त डॉ. राजाराम कोटा व परीवार यांनी मुकुट सुपुर्त केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.
शिर्डीच्या साईबाबांवर केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील भक्तांची मोठी श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी शिर्डी येथे साई समाधी दर्शनासाठी रोजच हजारोंच्या संख्येने साईभक्त देश आणि जगभराच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. विविध उत्सवाच्या निमित्ताने भक्तांची मांदियाळी लाखोंच्या संख्येत असते. त्याचबरोबर दिवाळी, नाताळ, नववर्ष अशा सुट्ट्यांच्या कालावधीमध्येही साई भक्त प्रचंड मोठी गर्दी शिर्डीमध्ये करत असतात.
साई चरणी येणारा साईभक्त हा साईबाबांवर प्रचंड श्रद्धेने येत असतो. आपल्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतील अशी श्रद्धा भक्तांच्या मनात असते. याच श्रद्धेपोटी अनेक साईभक्त बाबांसाठी नवस करतात. आपल्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, व्यवसायात भरभराट व्हावी, कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि समाधाना असावे या अपेक्षेने आलेला साईभक्त हा साई चरणी नतमस्तक होत असतो.
त्याचबरोबर साईंच्या नामस्मरणात केलेला नवस पूर्ण करण्यासाठी साईभक्त शिर्डीमध्ये आवर्जून येतात आणि आपला नवस पूर्ण करतात. भक्त आपल्या कुवती आणि इच्छेनुसार हा नवस पूर्ण करत असताना साई चरणी नतमस्तक होत लीन होतात. वर्षभर एकंदरीत पाहिलं तर अनेक सुवर्ण अलंकार साईचरणी भेट दिले जातात. त्याचबरोबर रोख स्वरूपात, चेक ड्राफ्ट यासह अनेक विदेशी चलनातील रोकड साईंच्या दानपेटी मध्ये आढळून येते. वर्षभरात कोट्यावधीचे दान साई चरणी भक्तांकडून अर्पण होत असते. आता यंदाही नवीन वर्ष सुरू होत असताना बंगलोर येथील भक्तांने लाखो रुपयांचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे.