मुंबई : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट हा मोठा राजकीय भूकंप ठरला. या दोन्ही पक्षातील उभ्या फुटी नंतर मूळ पक्षाच्या पक्ष प्रमुखांना सोडून गेलेल्या पण जुन्याच पक्षावर दावा ठोकून असलेल्या नेत्यांनी टीकेचे जोरदार प्रहार सुरू ठेवले. ते अद्यापही सुरूच आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वयावरून सतत भाष्य करीत आहेत.
नुकतेच अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी आता थांबले पाहिजे, तुम्ही मार्गदर्शन करा, काही चुकले तर सांगा असे म्हटले होते. अजित पवारांनी वारंवार केलेल्या या भाष्यावर आ.जितेंद्र आव्हाड, खा.सुप्रिया सुळे, आ.रोहित पवार आदींनी वेळोवेळी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आजच रोहित पवारांनी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर बोलावे, या आशयाची खोचक टीका केली.
मात्र आता या मुद्दयावर खुद्द शरद पवार यांनीच थेट भाष्य केले आहे. आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, “मला पक्षाने राज्यसभेवर पाठविले आहे. जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करणे आणि सहकाऱ्यांना मदत करणे हे माझं काम आहे. यापुढे मी निवडणूक लढणार नसल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यसभेची मुदत संपल्यानंतर रिटायर्ड होण्याचा विचार करीन.”
पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. अजित पवारांच्या वक्तव्याबद्दल पवार म्हणाले, अजित पवारांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर, अनेक लोकांची उदाहरणं देता येतील. वयाच्या ८३ व्या वर्षी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाई हे सुद्धा ज्येष्ठ होते त्यांचं पण वय होतं पण ते काम करत होते. त्यांच्या मागे जनतेचें बहुमत होतं. त्यामुळे अशा वय वगैरे काढण्याच्या गोष्टी काढू नये असे मला स्वतःला वाटत नाही.
जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करणं आणि सहकाऱ्यांना मदत करणं हे माझं काम आहे. त्यामुळे ते मी करत राहील. मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. राज्यसभेचे माझे एक-दोनच वर्ष राहिली आहेत. ते अर्धवट सोडू का? असा सवाल करत मला माझ्या पक्षाने राज्यसभेत पाठवलं. ते अर्धवट सोडून कसं थांबू? मला लोकांनी संसदेत पाठवलं आहे. त्यामुळे कार्यकाळ असेपर्यंत काम करत राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पवार पुढे म्हणाले अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेले आहेत. अजित पवार आणि त्यांना अशी भूमिका घ्यायला लावणाऱ्यांना पुन्हा पक्षात येऊ दिलं जाणार नाही. याबाबत माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे असेही पवार म्हटले आहे.