मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन मूळ शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभी फूट पडली. जवळपास 40 शिवसेना आमदार शिंदेंसोबत गेले. यात सुरुवातीला गेलेले 16 आमदारांवर पक्षांतर्गत कायद्यानुसार अपत्रता तसेंच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या 14 आमदारांवर त्याच पद्धतीने अपात्रता यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.
हा निकाल आज बुधवारी दुपारी 4 वाजता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला आहे. नार्वेकर जो निकाल देणार आहेत तो “मॅच फिक्सिंग”चा असणार आहे असा मोठा आरोप खा.राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. राऊत यांच्या आरोपांमुळे खळबळ उडणार आहे. मॅच फिक्सिंग नुसार निर्णय झाल्यास आम्हांला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जात निकालाआधी झालेल्या गाठीभेटी, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे निकाल असताना आयोजित केलेले दौरे याची माहिती न्यायालयाच्या पटलावर आणावी लागेल असे राऊत म्हणाले.
आज लागणारा निकाल दिल्लीतून फिक्स झाला असून त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारीला मुंबई दौरा आयोजित केला असावा. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डाओस दौराही घोषित झाला आहे. याचाच अर्थ निकाल काय लागणार हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे लागणारा निकाल हा दिल्लीतून फिक्स झाला असून याला मॅच फिक्सिंग’च म्हणावी लागेल असे सांगत खा. राऊत यांनी हे घटनाबाह्य सरकार असल्याचा पुनरुच्चार केला.