श्रीगोंदा(प्रतिनिधी दादा सोनवणे):
सध्या विधानसभा लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वहायला सुरवात झाली असून श्रीगोंदा तालुक्यातून विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांची मांदियाळी समोर येत आहे. मात्र आम्ही निवडणूक लढणार, पण ऐनवेळी अडचण नको म्हणून इच्छुक विधानसभा कोणत्या गटाकडून किंवा कोणत्या पक्षाकडून हे कोणीच सांगायला तयार नसल्याने समर्थक कार्यकर्ते संभमावस्थेत आहेत. दुसरी कडे लोकसभेसाठी सुजय विखे यांची भाजप पक्ष म्हणून भूमिका स्पष्ट असली तरी आ.निलेश लंके आणि राणीताई लंके लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढणार तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याबद्दल सध्या संदिग्धता असल्यानेही अनेक कार्यकर्त्यांसाठी “कोणता झेंडा घेऊ हाती” असा प्रश्न असणार आहे.
लोकसभेला सुजय विखे विरुध्द लंके!!
-सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातून अनेक इच्छुक उमेदवार जनतेशी संपर्क वाढविण्यात व्यस्त आहेत. मात्र इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षाकडून अथवा कोणत्या गटाकडून उमेदवारी करणार हे कोणीही सांगत नसल्याने तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे तसेच गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर दक्षिण लोकसभे मधून आमदार निलेश लंके याच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके ह्या कोणत्याही परीस्थित कोणीही विरोधक असले तरी निवडणूक लढवणार असेही त्यांनी शिव स्वराज्य यात्रेनिमित्त श्रीगोंद्यात आल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. मात्र कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या गटाकडून लोकसभा निवडणूक लढणार यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.
इच्छुकांची मांदियाळी.. कार्यकर्ते पेचात!!
-विद्यमान खासदार सुजय विखे हे सुद्धा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी एकास एक उमेदवार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा अनेक जण मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मात्र कोणता उमेदवार कोणत्या पक्षाची उमेदवारी करणार हे कोणीच सांगत नाही. विधानसभेसाठी कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे इच्छुक आहेत. त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्यामुळे नागवडे विधानसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट ) की भाजपा पक्षाकडून निवडणूक लढणार हे चित्र स्पस्ट नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते राजकीय परिस्थिती कडे लक्ष ठेवून आहेत.
पक्ष-गट नक्की नसला तरी मोर्चेबांधणी सुरू..
-भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना विरोधी उमेदवार म्हणून शिवसेनेचे साजन पाचपुते याचेंही नाव चर्चेत आहे. मात्र आघाडीत श्रीगोंदयाची जागा शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे आहे. जर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तिकिटावर अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली तर माजी आमदार राहुल जगताप यांची भूमिका काय असणार हे सुद्धा महत्वाचे आहे. राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. भारत राष्ट्र समितीचे घनश्याम शेलार हे सुद्धा काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार हे सुद्धा चित्र अजूनही स्पष्ट नाही. परिणामी त्याचेही कार्यकर्ते सैरवैर आहेत.
कार्यकर्ते पण “वेट अँड वॉच मोड”वर!!
लोकसभेसाठी लंके आणि विखे यांच्यात लढत एकासएक अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. तर विधानसभेसाठी भाजपकडून बनबनराव पाचपुते शिवसेनेकडून साजन पाचपुते तर अनुराधा नागवडे राहुल जगताप घनश्याम शेलार यापॆकी एक जण राष्ट्रवादी कडून पण कोणत्या गटाकडून हे उमेदवारी करणार हे जाहीर करत नसल्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यकत्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत मौन धारण केलेले चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. तालुक्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्यास अनेक जण इच्छुक आहेत. मात्र शरद पवार गट कि अजित पवार गट हे कोणीही सांगत नसल्यामुळे सर्वानी कोणालाही नाराज न करण्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे दोन डगरींवर पाय असल्याचे चित्र असताना यात कार्यकर्त्यांची दोलामय अवस्था झाली आहे.