पुणे: तलाठी भर्ती प्रक्रियेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ.रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे चांगलेच भडकले असून वारंवार बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला आहे. महसूलमंत्री विखे पाटील यांच्या या इशार्यानंतर आ.रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिले असून विखे साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर खुशाल करावी असे आव्हान दिले आहे.
तलाठी भर्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालात काही उमेदवारांना 200 पेक्षा अधिक मार्क पडल्याची आणि भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. अशात आ.रोहित पवार यांनी सरकारकडून होत असलेल्या भर्ती प्रक्रियेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांकडून वारंवार भर्ती प्रक्रियेत खोटे आरोप होत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देत खोटे आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावर आज गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी, सरकार कडून होत असलेल्या विविध परिक्षांत सध्या जे काय सुरू आहे त्यावर विद्यार्थीच बोलत आहेत. अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहेत. आम्ही वेळोवेळी याबाबत सरकार कडे विचारणा करत म्हणणे मांडत असून विद्यार्थ्यांच्या भावना पोचवत असल्याचे सांगितले. आता विखे साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करावी. तसेही आता आमच्यावर अनेक कारवाया सुरू असून अजून कोणत्या बाकी आहेत त्याही कराव्यात असे प्रत्युत्तर दिले. मात्र कारवाई करतानाच विद्यार्थ्यांच्या अडचणी, पेपर फुटी, तक्रारी याकडेही लक्ष द्यावे असे म्हंटले आहे.