नगर(प्रतिनिधी):
शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर शरद पवार यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदे आणि भाजपला निशाण्यावर घेतले. निकाल स्क्रिप्टेड असल्याचा आरोप शरद पवारांनी केला तर या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. याला आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
संकल्प महाविजय 2024 निमित्ताने..
-येत्या 14 जानेवारीला राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात महायुतीतील तीनही पक्षांसह घटक पक्षांचा एकत्रित महामेळावा आयोजित केला आहे. “संकल्प महाविजय 2024” असे मेळाव्याला नाव देण्यात आले असून नगर मध्ये बंधन लॉन इथे महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याच्या पूर्व तयारी बाबत आज आढावा बैठक राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी आपल्या भाषणात विखे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट तर शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार प्रहार केले.
ते मंत्रालयातही आणि अध्यक्षांकडेही गेले नाहीत!!
-अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सुनावताना विखे यांनी, ठाकरे यांनी केवळ माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे धोरण त्यांचे सरकार असताना राबवले. ते कधी मंत्रालयात गेले नाहीत की सरकार गेल्यावर सुनावणीच्या वेळी अध्यक्षांसमोर गेले नाहीत. ज्यांना आपला पक्ष वाचवता आला नाही, तुमचे 40-40 आमदार सोडून गेले ही फार छोटी घटना नाही, असा टोला ठाकरे यांना लगावला.
तुमचे आमदारही गेले आणि पक्षही गेले..
-राज्यातील जेष्ठ नेते, जे स्वतःला जाणता राजे समजतात त्यांच्या माध्यमातून ठाकरे कठपुतली दोरीवर नाचतात असा जोरदार प्रहार विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला. यांचे सरकार गेले.. पक्ष गेला.. दोघांचाही पक्ष गेला.. दोघे एकमेकांना सल्ला देता-देता दोघांचेही वाटोळे झाले.. आता शिल्लक काय राहिले?? अशी जोरदार टोलेबाजी राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणात केली.
निकालाने राजकीय संदिग्धता संपली!!
-आता म्हणे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. तो जाण्याचा अधिकार त्यांना आहे. मात्र निकालानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय संदिग्धता एकदाची संपली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार मजबूत झाले आहे. अजित पवार सोबत आल्याने डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिनचे झाले अधिक गतिमान कामे सुरू झाली आहेत असा दावा विखे यांनी यावेळी केला.