नगर(प्रतिनिधी):
सध्या देश श्रीराममय झालाय. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. शेकडो वर्षे मंदिरा बाहेर राहावे लागलेल्या रामाचा वनवास अखेर संपला आहे!! येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मात्र असे असले तरी हा सोहळा केवळ अयोध्या वासीयांचा न राहाता संपूर्ण देशाचा व्हावा असे प्रयत्न विविध पातळीवर सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर देशात या निमित्ताने दिवाळी साजरी व्हावी असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खा.सुजय विखे पाटील यांनीही आपल्या लोकसभा मतदारसंघात घराघरात दिवाळी सारखा सण साजरा व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
गेल्या महिनाभरा पासून खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिणेतील सर्व तालुक्यातील गावागावात, वाड्यावस्त्यांवर तसेच शहराच्या ठिकाणी नागरी प्रभागात साखर आणि डाळ वाटप सुरू केले आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या घरात दिवाळी साजरी करता यावी. नागरिकांनी श्रीरामाला लाडूचा प्रसाद करता यावा यासाठी मोफत साखर-डाळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला नागरिकांचा विशेषतः महिला वर्गाचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांतून मिळणारा प्रतिसाद आणि लोकांची असलेली प्रभू श्रीरामबद्दलची आस्था पाहता आता खा.सुजय विखे यांनी अजून एक अभिनय संकल्पना समोर आणली आहे. अयोध्येत 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना तो आपल्याला याची देहा याची डोळा अनुभवता यावा अशी लाखो श्रीराम भक्तांची इच्छा आहे. मात्र एकाचवेळी हे शक्य नाही. त्यामुळे अनेक भक्तांनी सवडीने आतापासूनच अयोध्या श्रीराम मंदिर दर्शनाचे प्लॅन सुरू केले आहेत.
अशात आता खा. सुजय विखे यांनी 22 जानेवारीला आपल्या मतदारसंघातील जे नागरिक अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्ताने उत्कृष्ट दिवाळी साजरी करेल, यात घराला आकर्षक विद्युत रोषणाई, पणत्या-दिव्यांची आरास, नेत्रदीपक रांगोळी असे साग्रसंगीत दिवाळी सणा प्रमाणे साजरा करेल अशा काही विशेष मोजक्या रामभक्तांसाठी लवकरच थेट विमानाने मोफत अयोध्येत श्रीराम मंदिर दर्शनाचा लाभ दिला जाणार असल्याची संकल्पना मांडली आहे.
यात काही कुटुंबातील प्रत्येकी दोन व्यक्तींना जवळच्या विमानतळ सोयी नुसार अयोध्या दर्शन मोफत करण्यात येणार आहे. सोहळ्यानंतर अयोध्येत मोठी गर्दी उसळणार हे निश्चित, मात्र लवकरात लवकर सर्वोत्कृष्ठ दिवाळी सणा सारखा सोहळा घरात साजऱ्या केलेल्या आणि त्यातून निवड झालेल्या नागरिकांना हा अयोध्या दर्शनाचा मोफत लाभ लवकरात लवकर दिला जाणार असल्याची माहिती आहे. नगर शहरातील एका कार्यक्रमात खा.विखे यांनी याचे जाहीर सूतोवाच केले आहे.