नगर(प्रतिनिधी):
महायुतीतील सर्व घटक पक्षांचा महामेळावा येत्या 14 जानेवारीला राज्यातील 36 जिल्ह्यात होणार आहे. या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी नगर मध्ये पार पडली. महायुतीतील सर्व पक्षांचा एकत्रित हा मेळावा असल्याने सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहून मेळावा भव्यदिव्य व्हावा यासाठी ही आढावा बैठक होती. बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.सुजय विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले गट आदी पक्षांचे दिलीप भालसिंग, प्रशांत गायकवाड, अनिल शिंदे, सुनील साळवे, अभय आगरकर, अरुण मुंडे, सचिन पोटरे, संपत बारस्कार, बाबा वाकळे आदी उपस्थित होते.
बैठकीस सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असले तरी पक्षाच्या आमदारांची अनुपस्थिती दिसून आली.
बैठक महायुतीच्या मेळाव्याची तयारी आणि नियोजनासाठी असली तरी या बैठकीचे निरोप घटक पक्षातील जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांना वेळेवर पोहचले नसल्याची खंत यावेळी काहींकडून व्यक्त करण्यात आली. याबाबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी राज्यात महायुती एकत्रपणे काम करते, सर्व नेते यांच्यात समनव्यातुन काम करते त्या पद्धतीने जिल्ह्यातही काम झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. बैठक आणि विविध कार्यक्रमांचे निरोप वेळेत मिळाले पाहिजे असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली. आम्ही आणि आमचे कार्यकर्ते नवीन आहे, थोडं आम्हांला सांभाळून घ्या असे सांगत सुनील साळवे यांनी व्यक्त केलेल्या सुचनांना सहमती दर्शवत घटक पक्षांना बैठक कार्यक्रमाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून लवकर निरोप मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रार वजा सूचनांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दुजोरा देत राज्यातील महायुतीमधील सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगल्या पद्धतीने समनव्यय असतो तसाच तो आता जिल्ह्यातील सर्व महायुतीतील घटक पक्षाच्या मध्ये झाला पाहिजे असे कबूल केले. यासाठी सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी यांचा एकत्रित व्हाट्सएप ग्रुप तयार करावा या प्रशांत गायकवाड यांच्या सूचनेचा अवलंब केला जाईल असे सांगितले. राज्यात आता निवडणुका जवळ असल्याने आपल्या सर्व पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. राज्यातील वातावरण महायुतीला पोषक आहे, आता आमदार अपात्रतेचा निकालही आपल्या बाजूने लागला आहे असे सांगत येणाऱ्या काळात महायुती चांगले काम करेल असा विश्वास व्यक्त केला.