नगर(प्रतिनिधी):
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर असून यानिमित्ताने त्यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. केंद्र सरकारने नुकतीच कांद्यावर निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये सरकारबद्दल मोठी नाराजी आहे. कांदा निर्यातबंदी प्रश्नी शेतकर्यांची आंदोलने झाली आहेत.
नाशिक-नगर जिल्हा हा कांदा पट्टा समजला जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक शहरात असल्याने आणि त्यांचा रोड शो आयोजित केला असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेते यांच्याकडून काही आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस-प्रशासनाने महत्वाच्या शेतकरी नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा देत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
किसान सभेचे नगर जिल्ह्यात डॉ. अजित नवले, स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांना पोलिसांनी काल पासूनच स्थानबद्ध केली असल्याची माहिती आहे. शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या दरम्यान आंदोलनाची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या आहेत.
डॉ.अजित नवले यांची मागणी..
-पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी व निर्यातबंदी लादल्यामुळे कांदा उत्पादकांचे झालेले नुकसान भरून मिळावे यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी भूमिका घेतली म्हणून काल रात्री बारा वाजता पोलिसांनी राहत्या घरी येऊन मला नोटीस बजावत घरातच रात्रभर स्थानबद्ध केले व सकाळी सुद्धा मी नाशिकच्या दिशेने जाणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली. मला नाशिकला जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले असले तरीही मी आमच्या मागणीचा पुनरुच्चार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल घोषणा करावी व कांद्याची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने करतो आहे.
-डॉ. अजित नवले
राज्य सरचिटणीस
अखिल भारतीय किसान सभा.