नगर(राजेंद्र त्रिमुखे):
दिवंगत शिवाजीराव बापू नागवडेंच्या आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्यातील राजकीय संघर्षामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नेहमीप्रमाणेच यंदाही लक्षवेधी लढत होण्याची चिन्ह आहेत. आमदार बबनराव पाचपुते यांनी अनेक निवडणुका लढल्या आणि जिंकल्या त्याही वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळ्या चिन्हांवर!! मात्र कुठेतरी वैयक्तिक आजारपणामुळे पाचपुते सध्या बॅकफुटला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाचपुते यांच्या घरातून कुणाला भाजपकडून उमेदवारी मिळते की महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या राजेंद्र नागवडे किंवा अनुराधा नागवडे या दांपत्याला महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी म्हटल्याप्रमाणे ती अपक्ष किंवा ते इतर मार्ग स्वीकारल्यास त्यांच्या पदरात उमेदवारी पडते का? याबद्दल आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नागवडे दांपत्याचा काँग्रेस विरोधात एल्गार??
राजेंद्र नागवडे हे अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असून त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील एक मोठं राजकीय प्रस्थ आणि दबदबा नागवडे कुटुंबाचा आहे. मात्र गेल्या दोन निवडणुका त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने निवडणुकीपासून दूर राहावं लागले. मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेच्या मैदानात जिंकण्यासाठी उतरवण्याचा निर्णय नागवडे दाम्पत्याने जाहीरपणे घेतला आहे.
काँग्रेसला जागा सुटने धूसर, म्हणून..
महाविकास आघाडीमध्ये श्रीगोंदयाची जागा नेहमीच शरद पवार यांच्या वर्चस्वाखाली राहिली असून अनेकदा राष्ट्रवादी पक्षाकडे गेली आहे. त्यात बबनराव पाचपुते आणि 2014ला राहुल जगताप या ठिकाणावरून निवडून आलेले आहेत. मात्र आता काँग्रेसमध्ये असलेले नागवडे दांपत्य यांनीही महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडून उमेदवारी मागितली असून काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष किंवा इतर योग्य पर्याय निवडून विधानसभा लढवणारच असा चंग बांधला आहे. मात्र महाविकास आघाडी कडून काँग्रेसला श्रीगोंदा ची जागा सुटणार हे धूसर दिसत आहे.
अजितदादांची उपस्थिती कुणाचे इंडिकेटर लावणार!!
एकूणच या राजकीय परिस्थितीमध्ये आज दिवंगत शिवाजीराव बापू नागवडे यांचा जयंती सोहळा साजरा होत असताना या जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार यांना विशेष निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित असणार आहेत. या अनुषंगाने पाहिल्यास आजच्या जयंती सोहळ्यास काँग्रेस व महाविकास आघाडीचे इतर वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरणार आहे.
नागवडेंच्या समोर पर्याय अनेक..म्हणून उपस्थिती अनेक!!
आजच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एकूणच जे चित्र समोर येत आहे त्यामुळे नागवडे यांच्यासमोर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय दिसून येत असला तरी चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आजच्या सोहळ्यास उपस्थिती असल्याने भाजपकडूनही त्यांना चुचकारले जात असल्यास दिसून येत आहे. श्रीगोंद्यात 2019ला भारतीय जनता पक्षाकडून बबनराव पाचपुते हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे जागावाटपात श्रीगोंदयाची जागा ही महायुतीत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जाण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आता नागवडे दांपत्याकडे काँग्रेस सह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष असे एकूण तीन पर्याय समोर असल्याचे दिसून येत आहे. कदाचित ते अपक्ष ही निवडणूक लढवू शकतात मात्र अपक्ष ऐवजी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवल्यास निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याने गरज पडल्यास ते अजित पवार गट की भारतीय जनता पक्ष याकडून निवडणूक लढवणार याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळेच आज बापूंच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने श्रीगोंद्यात अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे विशेष निमंत्रित असल्याने या चर्चेला अधिकच पुष्टी मिळत आहे.