नगर:
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील वाढलेल्या दौऱ्यांवर टीका केली आहे. सोशल माध्यमातून आजच्या सोलापूर येथील पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा संदर्भ देत आ.रोहित पवारांनी पंतप्रधानांचे वाढलेले दौरे पाहता मागील काळात आलेले लोकसभा निवडणूक सर्व्हे भाजप विरोधात असल्याची शंका व्यक्त करत हे दौरे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतल्याचा टोला लगावला आहे. तसेच आ.रोहित पवार यांनी जास्तीतजास्त खासदार निवडून येण्यासाठी पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा या सारखे
साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबवले जात असल्याचा आरोप केला आहे. आजच ईडी कडून रोहित पवार कुटुंबाच्या बारामती ऍग्रो या कंपनी बाबत नोटीस बजावली असून रोहित पवार यांना हजर होण्याचे सांगितले आहे.
काय आहे आ.रोहित पवार यांचे ट्विट..
“आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत, राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कमर्चारी, कंत्राटी कर्मचारी यासारखे अनेक घटक आज आंदोलने करत आहेत. मराठा-धनगर-मुस्लीम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु या सर्व प्रश्नाकडे राज्यसरकारच्या धुरिणांचे लक्ष जात नाही.
‘विकासपुरुष’ ही मोदी साहेबांची प्रतिमा आहे आणि याच प्रतिमेला बघून अनेक जण भाजपवासी झाले असल्याचे सांगतात. आज राज्यात कापसाला भाव नाही, निर्यातीच्या धोरणामुळे कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया, बेरोजगारी यामुळे युवा वर्ग निराशेच्या गर्तेत आहे.
हे राज्य सरकार महाराष्ट्राच्या मनाची बात कधी करणार नाही. त्यामुळं आदरणीय मोदी साहेब आज आपण महाराष्ट्रात आहात तर अस्वस्थ आणि रखरखत्या महाराष्ट्राच्या मनाची बात आपण करावी ही मराठी मनाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल ही आशा आहे.
Narendra Modi”