रिपाई जिल्हाध्यक्षपदी भैलुमे यांची निवड पक्षाच्या नियमानुसारच -अमित काळे
तोंडचा घास गेल्याने माजी जिल्हाध्यक्षाची धावपळ
पक्षातील वरिष्ठांना धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांची जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते लोकशाही पद्धतीने व पक्षाच्या नियमानुसार निवड झाली असल्याची माहिती रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी दिली. तोंडचा घास गेल्याने माजी जिल्हाध्यक्षाची धावपळ सुरु झाली असल्याचा टोला त्यांनी माजी जिल्हाध्यक्षांना लगावला.
राहुरी फॅक्टरी येथे पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव दिपक गायकवाड, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी एकमताने संजय भैलुमे यांची निवड केली. यासंदर्भात दूरध्वनीवरून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे व राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांना कल्पना देण्यात आलेली आहे. दक्षिण जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी माजी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या बढतीला समर्थन देऊन त्यांच्या बढतीबद्दल आनंद व्यक्त केला. तर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीची मागणी करुन सर्वानुमते भैलुमे यांची निवड करण्यात आली आहे.
पक्ष श्रेष्ठींनी जिल्हा संपर्क प्रमुख यांना आदेश दिले त्या आदेशान्वये ही निवड जाहीर झालेली आहे. माजी जिल्हाध्यक्ष मुंबई जरी गेले तरी रिकाम्या हाताने परत येण्याची वेळ आली आहे. वीस वर्षाचा कार्यकाळ भोगला असतानाही पदाच्या खुर्चीला चिटकून बसण्याची व इतर कार्यकर्त्यांना संधी न देण्याची घटना निंदनीय आहे. सर्व पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी श्रीकांत भालेराव व विजय वाकचौरे यांना नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे काळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीतील तोंडचा घास गेल्याने सैरभैर झालेले माजी जिल्हाध्यक्ष यांची धावपळ सुरु आहे. ते ना. रामदास आठवले यांना भेटले, मात्र त्यांना वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या आहेत. त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा 20 वर्षाचा कार्यकाळ अकार्यक्षम होता. क्लेराब्रुस मैदानावर झालेला मेळावा हा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे फेल झाला. कमी गर्दी व कार्यक्रमाचा उडालेला फज्जा यामुळे वरिष्ठांमध्ये देखील नाराजी निर्माण झाली होती. तेव्हाच त्यांनी जबाबदारी स्विकारुन जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. तरी देखील पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना उत्तर महाराष्ट्र सचिवपदी बढती दिली, मात्र ते वरिष्ठांवर आरोप करून त्यांची बदनामी करत असल्याचे काळे यांनी म्हंटले आहे.
धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करावी:
-रिपाईचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी निवडणूक आयोगाकडे जाण्याची एकप्रकारे दिलेली धमकी आहे. हे ना. आठवले यांना आव्हान दिल्यासारखे असून, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, नगर माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, आयटी सेलचे जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, शेवगाव तालुकाध्यक्ष सतिश मगर, युवक तालुकाध्यक्ष भाऊ वाघमारे, कर्जत शहराध्यक्ष सोहन कदम, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे यांनी केली आहे.