पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांच्या वाहनावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, सराईत गुन्हेगारावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
नगर(प्रतिनिधी):
पोलीस ठाणे नेवासा येथे सागर कर्डिले रा. गेवराई याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. सागर कर्डिले हा गेवराई गावामध्ये आला असल्याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यास पकडण्यासाठी पोलीस खाजगी वाहनातून गेले असता पोलीस ज्या वाहनातून गेले होते त्या वाहनावर सागर कर्डिले याने डंपर धडकवून पोलीसांच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे सागर कर्डिले या सराईत गुन्हेगारावर खुनाचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. या वेळी पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे हे किरकोळ जखमी झाले आहेत, पोलीसांनी डंपर जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अहीरे करीत आहेत.
“कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही”:
-कायद्याचे राज्य आहे, समाजामध्ये शांतता सुव्यवस्था रहाणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे पोलिसांचे काम आहे. कोणी कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवत असेल तर अशा गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा काय असतो दाखवुन दिले जाईल.
-धनंजय अ. जाधव,पोलीस निरीक्षक,नेवासा.